मौजे बांगर्डे येथे दलित वस्ती पाणी पुरवठा योजनेतील पाईप चोरी प्रकरण; चोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, उपोषणाचा इशारा..

दिनांक ३१ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

मौजे बांगर्डे (तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर) येथे दलित वस्ती पाणी पुरवठा योजनेअंतर्गत घाडगे वस्तीतील लोखंडी पाईप चोरी झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात श्री दिनकर शेळके यांच्यासह काही जणांचा हात असल्याचा आरोप होत असून, संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

घनश्याम शेळके (बांगर्डे माजी सरपंच), भीमराव घोडके (श्रीगोंदा), नितीन जावळे (श्रीगोंदा) आणि अंबादास घोडके (पारगाव, श्रीगोंदा) यांनी गटविकास अधिकारी, श्रीगोंदा तालुका यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, दलित वस्ती पाणी पुरवठा योजनेतील लोखंडी पाईप चोरी करून त्याचा उपयोग श्री दिनकर शेळके यांनी त्यांच्या गोठ्यात केला आहे. या प्रकारचा पंचनामा देखील करण्यात आला असून चोरी पकडल्यावर शेळके यांनी पाईप ग्रामपंचायतीकडे जमा केले आहेत.

चोरीचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
तक्रारदारांच्या मते, संबंधित ग्रामसेवक गायकवाड मॅडम आणि सरपंच यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे. शासकीय मालमत्तेच्या चोरीचा हा गंभीर प्रकार असून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

उपोषणाचा इशारा
चोरीचा गुन्हा दाखल न झाल्यास तक्रारदारांनी ६ फेब्रुवारी २०२५ पासून पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “शासकीय मालमत्तेची चोरी हा गंभीर गुन्हा आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय उरणार नाही,” असे घनश्याम शेळके व तक्रारदारांनी सांगितले.

स्रोत:(निवेदन)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading