दिनांक ३ मार्च,श्रीगोंदा:
तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावर वस्तीगृहाची सुविधा करण्यात येते. विद्यार्थी या ठिकाणी राहून आपले शिक्षण पूर्ण करतात. परंतु, या सवलती पासून वंचित करण्याचा कुटील डाव श्रीगोंदा तालुक्यातील महसूल प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार यांनी आखल्याचे काही कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे. सुनिल ओहोळ (बसपा जिल्हा प्रभारी) तसेच वसंतराव नितनवरे, संतोष शिंदे (दलित महासंघ) व काही पालकांनी याठिकाणी याबाबत निषेध व्यक्त करीत ही बाब गंभीर असल्याचे मत व्यक्त केले आहे.

कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव बघता, मागील वर्षी कोविड केअर सेंटरसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहाचा वापर केला गेला होता. सदरील वस्तीगृह प्रशस्त असल्याने या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची व्यवस्थित सोय होईल. असे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय करून, येथील कोरोना बाधित रुग्णांची व्यवस्था करणे चुकीचे असल्याचे मत निवेदनात पालकांनी नमूद केले आहे.
याबाबत योग्य तो निर्णय घेऊन, विद्यार्थ्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवण्याची विनंती पालकांनी केली आहे. जर विद्यार्थ्यांना पर्यायी ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला. तर, पालक व काही पुरोगामी संघटना आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते आहे. नमूद वसतिगृहामध्ये पंचात्तर मुले व शंभर मुली असा पट आहे. अचानक यांना वसतिगृहातून स्थलांतरित करून, एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये पाठवणे चुकीचे व गैरसोयीचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ‘कोविड १९’ च्या रूग्णांना नमूद खाजगी ठिकाणी पाठवण्यात यावे. खाजगी ठिकाणी विद्यार्थ्यांचा सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित होईल, अशी भीती पालकांसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.
याबाबत बहुजन समाज पार्टीचे सुनिल ओहोळ यांनी तहसीलदार प्रदीप पवार यांना फोनवरून विचारणा केली. वसतिगृहाच्या जवळच प्रशस्त इमारतीमध्ये विद्यार्थ्यांची सोय करीत, सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले आहे. या प्रकरणात कोरोना श्रीगोंद्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मुळावर उठल्याचे मात्र,यातून स्पष्ट होत आहे.
स्रोत:(निवेदन)
