दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) दिग्गज नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन श्रीगोंदा नगरपालिकेच्या मागील ३५ वर्षांपासून क्षीण होत चाललेल्या कारभाराचा सविस्तर लेखाजोखा मांडला आणि शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले.
यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले की, श्रीगोंदा शहर बारामती शहराच्या तुलनेत जवळपास २५ ते ३० वर्षे मागे आहे आणि शहराला विकासाची कोणतीही निश्चित दिशा मिळालेली नाही.
प्रक्रिया पूर्ण करून निवडून आलेल्या नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी भ्रष्टाचाराचा कहर केला, शहर विकासाकडे दुर्लक्ष केले आणि नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचे ‘पातक’ केले, अशी गंभीर टीका करण्यात आली.
घनश्याम अण्णा शेलार यांनी शहरातील विकास कामांची दुर्दशा व्यक्त केली. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेची शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी असताना, श्रीगोंदा शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दरमहा साडेसात हजार पेक्षा जास्त जार खरेदी करावे लागतात, ज्यामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते आणि लोकांना विनाकारण पैसे खर्च करावे लागतात.
श्री. शेलार यांनी नमूद केले की, अनेकदा पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन आणि गॅस पाईप लाईनच्या नावाखाली रस्ते खोदून निधीचा अपहार आणि मोठा भ्रष्टाचार झाला आहे.

‘लेंडी नाला’ आणि ‘नाना नानी पार्क’ सारखे प्रकल्प झालेच नाहीत. पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीदोषांमुळे ३५ वर्षांच्या नगरपालिकेला क्षीणता आली आहे.
शहराची दुर्दशा झाली असून, शहर हद्दीतील वाड्या-वस्त्या मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत.
यापूर्वी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, मात्र श्रीगोंदा नगरपालिकेत सत्तेत असलेल्या तत्कालीन सदस्य आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची विकासाची जबाबदारी होती, परंतु अर्थपूर्ण संबंधांमुळे ते शक्य झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.
घनश्याम अण्णा शेलार यांनी या वेळी आश्वासन दिले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) उमेदवारांना निवडून दिल्यास आम्ही प्रसिद्ध केलेला वचननामा अमलात आणून विकासाची वाटचाल गतिमान करू आणि श्रीगोंदा शहराला विकासाची दिशा देऊ.’ विकासाचा दृष्टिकोन असलेले उमेदवार नगरपालिकेत गेले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.
या पत्रकार परिषदेला घनश्याम अण्णा शेलार, राजेंद्र दादा नागवडे, बाळासाहेब नाहटा, भगवान आबा पाचपुते, अण्णासाहेब शेलार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योतीताई खेडकर, अवि उदमले, किशोर नेटके, नागवडे ताई आणि सर्व उमेदवार उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार परिषद)
