श्रीगोंद्यात शेअर मार्केटच्या आमिषाने शेकडो कोटींची सायबर फसवणूक..? जमिनी, दागिने, बचत गमावलेल्या गुंतवणूकदारांना मोठा गंडा.!

दिनांक १ जुलै २०२५, श्रीगोंदा::

श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून एकच चर्चा चांगलीच गाजतेय ती हजारो कोटींच्या ऑनलाईन फसवणुकीची.! शेअर मार्केटमधून अल्पावधीत प्रचंड परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने सामान्यांपासून ते धनिकांपर्यंत अनेकांनी आपल्या जमिनी, दागिने, बचत व कर्जावरही पैसे उभारून एका खासगी एजंटकडे गुंतवणूक केली. परंतु, यामागे असलेली भलीमोठी सायबर फसवणूक आता उघडकीस येऊ लागली आहे.

या पाच सहा एजंटनी ७ ते १४ टक्के महिन्याला परतावा देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उभारले. सुरुवातीला काहींना ठरलेला परतावा मिळाल्याने गुंतवणुकीचा प्रवाह वाढत गेला. मात्र नंतर अचानक परतावा थांबला आणि एजंटही गायब झाला.

Arenex या कंपनीकडून यापूर्वी झालेल्या फसवणुकीचे कटू अनुभव असूनही, यावेळी अधिक आकर्षक आमिष आणि भुरळ घालणाऱ्या मार्केटिंगमुळे अनेक सुजाण नागरिक, शासकीय अधिकारी, पत्रकार, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठीत लोक यामध्ये अडकले.

एजंट काही काळ दुबईत असल्याची माहिती असून, सध्या तो पुण्यात असल्याची चर्चा आहे. “मी तुमची मूळ रक्कम परत करेन” अशी हमी त्याच्याच वकिलांमार्फत दिली जात असल्याने अनेक गुंतवणूकदार अजूनही ‘मुद्दल तरी मिळेल’ या आशेवर आहेत.

या पार्श्वभूमीवर काही फसवणूक झालेल्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिले असून, काहींनी थेट वकिलामार्फत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. यामुळे सायबर गुन्हे शाखेचे लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे.

गंमत म्हणजे, ज्यांच्याकडे ‘शिंगाड भाताने भरलेले’ होते, म्हणजेच मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी पैसा होता, त्यांच्याच हातून फटका बसल्याचे बोलले जात आहे. सामान्य आणि गरीब लोक अशा मोहाच्या जाळ्यात पडले नाहीत हेच त्यांचं ‘सौभाग्य’ असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी यापूर्वीच Arenex फसवणुकीनंतर जनतेला सायबर फ्रॉडविषयी जागरूक केलं होतं. त्यांनी पत्रकार परिषदेमार्फत जनजागृती मोहीम राबवली होती.

तरीही ‘पैसा दुप्पट’ होईल या मोहाच्या भूलथापांना भुलणाऱ्यांची संख्या अजूनही कमी नाही हेच यावरून स्पष्ट होते.

सध्या श्रीगोंदा पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा गोपनीय तपास सुरू आहे. तसेच नागरिकांना पुन्हा एकदा अशा फसवणूक प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात यावे, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.

नागरिकांना आवाहन:

कोणतीही गुंतवणूक करताना कंपनीची पार्श्वभूमी, नोंदणी, आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता आणि कायदेशीर वैधता याची पूर्ण शहानिशा करणे अत्यंत आवश्यक आहे. “सोने वाटणाऱ्यांची रांग लागलेल्या बाजारात, फक्त लुटारूंचेच साम्राज्य असते” हे लक्षात ठेवावे.!

स्रोत:(अधिकृत माहिती नुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading