दादासाहेब रूपवते कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन: भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त बहुजन चळवळीतील मान्यवरांची मांदियाळी..

दिनांक ९ एप्रिल २०२५, संगमनेर/श्रीगोंदा:

भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव तसेच कालकथित बहुजन नेते दादासाहेब रूपवते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने दादासाहेब रूपवते कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन शिक्षण संघ, मार्केट पब्लिकेशन आणि सुजात फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष सोहळा संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस सतीश ओहोळ यांनी पत्रकारांना दिली.

कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. संघराज रूपवते, अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लोलेकर, तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी व माजी आमदार लहू कानडे यांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल –
सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत गायक विकास भालेराव आणि सहकारी यांचा साद्यंत गायनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर ११:०० ते १:०० या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडेल.

त्यानंतर १:०० ते २:०० या वेळेत “भारतीय संविधानाने आजचे समकालीन वास्तव” या विषयावर परिसंवाद होणार असून, प्रा. डॉ. सुरेश जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. श्रीरंजन आवटे, प्रा. डॉ. मिलिंद कसबे आणि प्रा. डॉ. राहुल गोंगे यांचा सहभाग राहणार आहे. परिसंवादानंतर दादासाहेब रूपवते यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात बहुजन चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय संविधान अमृतमहोत्सव समिती, दादासाहेब रूपवते जन्मशताब्दी समिती तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस सतीश ओहोळ यांनी केले आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading