दिनांक ४ जून,श्रीगोंदा:
तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा यांच्यावतीने पेडगाव येथे खरीप हंगाम पूर्वतयारी म्हणून सोयाबीन व कांदा बियाणे उगवन तपासणी प्रात्यक्षिक करण्यात आले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
खरीप हंगाम मध्ये शेतकरी अनेक वेळा स्वतःकडील बियाणे वापरतात परंतु सदर बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करणे गरजेचे आहे.यामुळे, शेतकऱ्यांची बियाणे उगवण बाबत होणारी फसवणूक टाळता येऊ शकते. असे मत मंडळ कृषी अधिकारी शितल आरु यांनी व्यक्त केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक संदीप बोदगे , किसन सांगळे व शेतकरी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गावोगावी असे प्रशिक्षण आयोजित केले जात आहेत. प्रात्यक्षिक नमुना- गोणपाटाचे चौकोनी तुकडे करून दोन नमुने तयार करावेत, ते ओले करून त्यावर शंभर दाणे मोजून ते दीड ते दोन सेंटिमीटर अंतरावर दहा दहा च्या रांगेमध्ये ठेवावेत, त्यावर हलकेसे पाणी शिंपडावे व गोंणपाट ची गुंडाळी करून सावलीत ठेवावे.एक दोन दिवसानंतर अधून-मधून त्या गोणपाटावर पाणी मारावे, सहा ते सात दिवसानंतर शंभर पैकी ७० ते ७५ बियाणे उगवन झालेले असतील. तर, ते बियाणे पेरणी योग्य समजून पेरणीसाठी वापरावे. या बियाणे उगवण क्षमता चाचणीमुळे शेतकऱ्यांचे बियाणे उगवणी बाबत खात्री होते व बियाणे न उगवण्याचा व पेरणी खर्च वाचतो.
ज्या बियाण्याची उगवण क्षमता चाचणी झालेली आहे. असे बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यास उगवण क्षमता चांगली होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के निश्चित वाढ होते. तसेच मागील वर्षी तालुक्यांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे यावर्षी खबरदारीचा उपाय म्हणून, हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. हुमणी किडीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर केल्यास हुमणीचे ५० टक्के नियंत्रण होऊन किडीमुळे पिकांचे पुढील होणारे नुकसान टाळता येऊ शकते. शेतकऱ्यांनी कमी खर्चाचे अशी उपाययोजना करून होणारे नुकसान टाळावे. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
(वार्तांकन व छायाचित्रे:अनिल दळवी)
