शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचे धरणे आंदोलन..
01 mins
शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन.
:संदीप नागवडे .
दिनांक २३ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून,आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी माध्यमांना दिली आहे.
नागवडे म्हणाले की,भाजपाचा विश्वासघात करुन काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असतांना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सात बारा कोरा करू,अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. २ लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही.
भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट,शेतीउपकरणं, पशुपालन, शेळीपालन, मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱयांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे ४३ लाख खातेधारकांना १९ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचे निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत असल्याचे नागवडे म्हणाले.