मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS). भाग १०.

… आणि माझा पाय वाचला !

भाऊ आता सहा वर्षांचा झाला होता. आईने त्यालाही गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं. ताई आणि भाऊ मिळूनच शाळेत जात. मलाही आता तिसरं वर्ष लागलं होतं. आजूबाजूचं थोडं कळायला लागलं होतं. मला आठवतं, की मी लहान असताना आमचं नवीन घर दारूसाठी येणाऱ्या लोकांनी गजबजलेलं असायचं. माझ्या अडाणी आईला व्यवसायाचं सूत्र बरोबर समजलं होतं. ती नेहमी घर व दारूचे पेले स्वच्छ ठेवत असे. ग्राहकांसोबत तिचे बोलणेही नम्र असायचे. बरेच जण दारू प्यायला यायचे, तेव्हा कधी – कधी दारू पेल्यात शिल्लक ठेवून निघून जायचे. अन्य ठिकाणी अशी दारू परत कुणाला तरी विकली जायची. आई मात्र ग्राहकाची उरलेली दारू फेकून देत असे .

कधी कधी दारूच्या नशेत बरेच जण पैसे परत न घेता निघून जात, तर कधी कोणाच्या खिशातील पैसे तिथे पडत, अशा वेळी आई आठवणीने ज्याचे पैसे त्याला परत करत असे . आईच्या अशा चोख व्यवहारामुळे दारूच्या ग्राहकांची घरी कायमच गर्दी असे. ते सर्व लोक आईला धाकली बहीण म्हणूनच हाक मारत. नवीन घरात आईचा दिनक्रम ठरलेला होता. ती पहाटेच साडेचारला उठून नाल्यात दारू पाडायची. तिचं काम संपेपर्यंत ताई व भाऊ उठलेले असत. मग ती त्यांना आंघोळ वगैरे घालून शाळेत पाठवायची. माझी आंघोळ मात्र दुपारी होत असे. भिलाटीत केसांना लावायचं तेल म्हणजे सुद्धा एक चैन होती. त्यामुळे ती परवडत नसे. एखाद्याला खूपच वाटलं, तर रेशनमध्ये मिळणारं गोडेतेल लावून हौस भागविली जाई. सकाळची सगळी कामं आटोपल्यानंतर आई आंघोळ करून देवपूजेला बसत असे. ती फार श्रद्धाळू होती. साईबाबांवर तिची फार भक्ती. भिलाटीत कधी कोणी साधू किंवा भिक्षेकरी आला, तर आई त्यांना कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नसे.

कधी भाकरी, तर कधी मूठ – दोन मूठ धान्य ती त्यांच्या झोळीत टाकत असे. खरं तर त्या मूठभर धान्याचेही आम्हाला फार मोल असायचे. पण आमची गरिबी कधीच आईच्या श्रद्धेआड आली नाही. आमच्या घरात एका बाजूला देवघर तर दुसऱ्या बाजूला दारूचे ड्रम ठेवलेले असायचे. ती दारू विकते म्हणजे काहीतरी वाईट काम करते, असं ना तिला वाटायचं, ना अन्य कुणाला. दारू विकणे ही जशी आमची गरज होती, तशी आमच्या भिलाटीतील पुरुषांसाठी दारू हा एकमेव विरंगुळा असे. भिलाटीतील लोकांव्यतिरिक्त गावातील प्रतिष्ठित व तालेवार लोकही दारूसाठी घरी यायचे. दारूचे व्यसन त्या सर्वांच्या जीवनाचाच एक भाग होता. भिलाटीतील आणखी एक विरंगुळा म्हणजे बोलीभाषेतील लोकगीतं. भिलाटीत जवळपास सर्वांनाच ती गाणी तोंडपाठ असत. आई व गवलाबाई जेव्हा दळायला वगैरे बाहेर जात तेव्हा त्यांच्या तोंडून सहजच ती गाणी बाहेर पडायची. मी आईच्या कडेवर बसून ती गाणी ऐकत असे. लहान असतानाही ती गाणी मला खूप आवडायची.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कधीकधी मी आपल्या बोबड्या आवाजात गाण्याचा प्रयत्न करत असे, तेव्हा सर्वांना माझे खूप कौतूक वाटे. मी चुणचुणीत असल्याने आमच्या घरी दारूसाठी येणारे अनेक लोक मला प्रेमाने उचलून कडेवर घेत. मध्येच कोणीतरी मला गाणी म्हणायला लावत असे. मी गाणी म्हटली की खूश होऊन आपल्या चखण्यातील शेंगदाणे किंवा चिवडा मला खायला देत. त्यावेळी मला खूप आनंद होत असे. आई आता बाहेरचं जग बघत होती त्यामुळे तिला बऱ्याचदा काळजी वाटायची की या अशा वातावरणात आपल्या मुलांवर चांगले संस्कार कसे होतील? पण तिचाही नाइलाज असे. मग चांगल्या वातावरणाची कमतरता ती आपल्या चांगल्या शिकवणीने भरून काढत असे. सतत आम्हाला काही ना काही सांगत असे, शिकवत असे. दारात आलेल्यांना कधीच परत पाठवू नये, असं ती नेहमी सांगायची. घरी कधी कोणी साधूपुरुष आले, तर ती न चुकता मला त्यांना नमस्कार करायला सांगायची. साधूच्या तोंडून मला आशीर्वाद देववत असे. दारात गाय आली, तर ती मला तिच्या कपाळाला हात लावून नमस्कार करायला सांगत असे.

पुढे मी मोठा झाल्यानंतर जेव्हा – जेव्हा परीक्षेला जात असे, तेव्हा – तेव्हा आई उपवास करायची किंवा एखाद्या देवाकडे नवस तरी बोलत असे. खरं तर तिची श्रद्धाच माझी प्रेरणा होती. पुढे काही पुस्तकं शिकल्यावर मी तिच्या नेहमीच्या नवसांबद्दल तिच्याशी वाद घालत असे. पण तिचे उपवास, नवस मी काही कमी करू शकलो नाही. रोज हाती पडणारे पुस्तक मला एक नवा दृष्टिकोन देत असे. आता मी थोडंफार समजण्याएवढा मोठा झालो होतो. ताई व भाऊची शाळा नियमित सुरू होती. ताई आता चौथ्या वर्गात, तर भाऊ पहिल्या वर्गात शिकत होता. मी मात्र अजुनही कधी आईच्या कुशीत, तर कधी मोठमायच्या मांडीवर लोळत होतो. वस्तीतील छोट्या मित्रांसोबत खेळत होतो. लहान असल्याने माझ्यासाठी जीवन म्हणजे ‘आनंदी आनंद गडे ‘असंच होतं. असंच एकदा मी व माझे काही मित्र गल्लीतच खेळत होतो. आम्ही सर्व एकमेकांच्या मागे जोरानं पळत होतो. पळता – पळता अचानक माझा पाय एका धारदार दगडावर आदळला. मी जोराने खाली पडलो. तो दगड माझ्या पायाच्या घोट्याजवळ बराच आत शिरला होता. खूप रक्त वाहत होतं. मी जोरजोराने रडायला लागलो. रडत – रडतच घरी आलो.

मला तशा अवस्थेत बघून आई धावत माझ्याकडे आली. माझी जखम दिसल्याबरोबर तिने मला उचलून घेतलं. मावशीही तिथेच होती. तिने लगेच कुदालीचा पाला आणला व तो कुटून त्याचा चोथा बनवला व एका मळक्या फडक्याच्या सहाय्याने तो पाला माझ्या जखमेवर बांधला. आम्हा पोरांना अशा जखमा नेहमीच होत असत. त्यामुळे माझ्या जखमेचं कोणाला विशेष वाटलं नाही. तशातच मी आणखी मातीत खेळायला सुरवात केल्यामुळे ती ओली जखम आणखी चिघळली. काही दिवसांनी जखमेतून घाण वास यायला लागला. पुढे – पुढे तर मला पाय खालीदेखील ठेवता येत नव्हता. माझा पूर्ण तळपायच पिचडून गेला होता. त्या रात्री मला खूप ताप आला. मी रात्रभर रडत होतो. माझ्यासोबत आईसुद्धा जागीच होती. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS). Part 10)

आमच्या भिलाटीत रोगराई, साथीचे आजार हे नित्याचेच असायचे. वस्तीचे गलिच्छ वातावरण त्यात अधिकच भर घालत असे. कधी कोणी आजारी पडला, तर डॉक्टरकडे जाण्याऐवजी भगताकडे जाऊन तंत्र – मंत्र करणे व कोंबडं कापणे यावरच सर्वांचा भर असे. आजार वाढलाच, तर एखाद्या वैदूकडे जाऊन काहीतरी जडीबुटी वगैरे घेतली जाई. त्यावेळी आमच्या भागात डॉक्टरांची बरीच कमतरता होती. शिवाय भिल्ल लोक डॉक्टरकडे जायला फार घाबरत. बऱ्याच जणांना डॉक्टरचे इंजेक्शन म्हणजे माणूस माराचे औसद ‘वाटत असे. दुसऱ्या दिवशी आई व मोठमायने मला भिलाटीतील एका भगताकडे नेलं. भगताने माझ्या पायाला चोळत तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटला व पायाला घोट्याजवळ एक धागा बांधून आम्हाला परत पाठवून दिलं. त्याच्या मते सेप्टिक झालेल्या जखमेवर एवढे उपचार पुरेसे होते. माझी जखम व त्यासोबत माझ्या वेदनाही वाढतच होत्या. आईने मग नाना तऱ्हेचे घरगुती उपचार….

क्रमशः
स्रोत:(डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.!या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading