मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड..(IAS).भाग २४.

माझे शिक्षक , माझे दीपस्तंभ

चौथीच्या परीक्षेत मला ९ ० टक्के गुण मिळाले. संपूर्ण केंद्रातून मी पहिला आलो. निकालानंतर मी दुसऱ्या शाळेत जाणार म्हणून शाळेतच एक छोटासा निरोप समारंभ घेण्यात आला. त्या समारंभाला आईसुद्धा हजर होती. सर्व शिक्षकांनी माझं खूप कौतुक केलं. त्यांच्या त्या प्रेमळ वागणुकीनेच मला शिक्षणाची गोडी लागली होती. आता त्या सर्वांना सोडून जावं लागणार या विचाराने मला खूप वाईट वाटत होतं. आईने मला सर्व शिक्षकांच्या पाया पडायला लावलं. सर्व शिक्षकांनी, बाईंनी आईजवळ माझं खूप कौतुक केलं. आई तर अगदी भारावूनच गेली होती. काय बोलावं, हे तिला सूचत नसावं. शाळेतून परत येताना माझ्या मित्रांचा मी निरोप घेतला. कारण लगेच उन्हाळ्याच्या सुट्या लागणार होत्या. त्यांच्याशी दीड, दोन महिने भेट होणार नव्हती.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्यांची गंमत असायची. ते त्यांच्या मामा, आत्या, मावशी यांना भेटायला बाहेरगावी जाणार होते. मात्र माझे सर्व नातेवाइक भिलाटीतच राहत असल्यामुळे मला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं काही विशेष वाटत नसे. उलट मला त्या नकोशाच वाटायच्या. त्यामुळे इतर मुलं सुट्ट्यांची वाट बघत असतानाच मी मात्र शाळा केव्हा सुरू होईल, याची वाट बघत असे.

आतापर्यंत मी एकदाच बाहेरगावी नातेवाइकाकडे गेल्याचं मला आठवतं, ते म्हणजे जामन्यापाड्याला, दोन दिवसांकरिता आईच्या मामाकडे. त्यानंतर काही प्रवासाचा योग आला नाही. मला आठवतं, की त्या सुट्ट्यांमध्ये भिलाटीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम होती. आमच्या इंदिरानगरकरिता आदिवासी महिलेसाठी एक जागा राखीव होती. पण अडचण होती उमेदवाराची. आमच्या घरी दारू प्यायला येणाऱ्या मंडळींनी इकडच्या – तिकडच्या गोष्टी सांगून आईचं नाव उमेदवार पदासाठी जाहीर केलं. आणि गंमत म्हणजे आईच्या विरोधात कुणीच नसल्यामुळे ती बिनविरोध निवडूनही आली. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वर्णी लागणारी ती आमच्या भिलाटीतील पहिलीच व्यक्ती होती. या गोष्टीचा इतर काही फायदा होतो न होवोल, मात्र गावातील सुशिक्षित व प्रतिष्ठित स्त्रियांची आमच्या घरी ये – जा सुरू झाली. त्यांच्या सहवासाने त्यांच्या राहणीमानाचा, विचारांचा, वागण्या – बोलण्याचा नाही म्हटला तरी थोडा प्रभाव आमच्यावरही पडत होता व तो दिसतही होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा भर आता ओसरला होता. माझ्या सुट्ट्याही आता संपत होत्या. मला नवीन शाळेत दाखला घ्यायची तयारी करायची होती. पण मला ती तयारी करण्याची गरजच पडली नाही. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनीच परस्पर माझा सामोड्याच्या नूतन मराठा विद्यालयात दाखला रवाना केला होता. त्यांच्या निस्वार्थ प्रेमाचा हा आणखी एक पुरावाच होता. नूतन विद्यालयात ५ वी ते १० वी पर्यंतच्या शिक्षणाची सोय होती. शिवाय कला शाखेचे ११ वी १२ वी पर्यंत शिक्षण घेता येत होते. या शाळेत आता मला नवीन शिक्षक, नवीन मित्र व नवीन ज्ञान मिळणार होते. ही शाळा बरीच मोठी होती. या शाळेत आम्हाला शिक्षकांना गुरुजींच्या जागी सर, बाईच्या ऐवजी मॅडम म्हणावं लागायचं.

पहिल्या दिवशी प्रार्थनेवेळी मी पटांगणात गेलो तेव्हा एवढी सारी मुलं पाहून थोडा वेळ मी भांबावूनच गेलो. प्रार्थनेवेळी सर्व विद्यार्थी पटांगणात जमत. त्यावेळी प्रत्येक वर्गासाठी एक मॉनिटर असे. हा मॉनिटर समोर येऊन सर्व असेम्ब्लीला कमांड देत असे. एक – दोन आठवड्यांनंतर माझी मॉनिटर म्हणून नेमणूक झाली. आतापर्यंत आम्हाला पूर्ण वर्षभर एकच शिक्षक शिकवत होते. या नवीन शाळेत मात्र प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक होते. हे आमच्यासाठी नवीन होतं. या शाळेबद्दल माझ्या मनात सुरवातीलाच खूप कुतूहल निर्माण झालं . ज्ञानाच्या एका मोठ्या जगात आपण प्रवेश करत असल्याची जाणीव मला इथेच झाली. नूतन विद्यालयात आम्हाला गणितासाठी जी. के. देसले सर, हिंदीसाठी बडगुजर सर व कार्यानुभवसाठी पी . एम. घरटे सर होते. यांच्या व्यतिरिक्त इतरही शिक्षक होते; पण या तिघांचं माझ्या शैक्षणिक प्रवासात एक विशेष स्थान आहे. त्यांनीच एकप्रकारे माझ्या आयुष्याला कलाटणी दिली.(I had a dream! Dr. Rajendra Bharud .. (IAS). Part 24.)

गणिताचे देसले सर म्हणजे फारच शिस्तीचे. गृहपाठ जर झाला नाही, तर आमची खैर नसे. गृहपाठ न करणाऱ्या विद्यार्थ्याला एवढ्या छड्या बसत, की तो दिवसभर हात चोळत बसत असे. अशी शिक्षा एकदा झाली की, तो दुसऱ्यांदा कधीच गृहपाठ करायला विसरत नसे. माझं गणित चांगलं असल्यामुळे माझ्यावर त्यांचा विशेष लोभ होता. भूमितीच्या अभ्यासासाठी ऑफिसमधून कंपास, अर्धचक्र असं काही सामान आणायचं असलं, की ते मलाच पाठवत. त्यांच्या मते मी त्यांनी सांगितलेल्या वस्तू अचूक आणत असे. आणि खडू आणायला तर सर्व शिक्षक मलाच पाठवत, कारण खडू हे मुख्याध्यापकांच्या केबिनमधून आणावे लागायचे. खडू आणायला गेलेल्या विद्यार्थ्याला ते खूप प्रश्न विचारत आणि जर त्याने व्यवस्थित उत्तर दिलं नाही. तर, ते त्याला तसाच रिकामा परत पाठवत असत. मी त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरं देत असल्यामुळे त्यांच्या केबिनमधून मी कधीच रिकामा परत आलो नाही. त्यामुळे सर्व शिक्षक खडू आणायला मलाच पाठवत असत.

शनिवारी आमची सकाळची शाळा असे. एका शनिवारी मी सर्व विद्यार्थ्यांसमोर उभा राहून संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ म्हणत होतो. ‘पसायदान’ पूर्ण म्हणून झाल्यावर सर्व शिक्षकांनी कौतुकाने माझ्याकडे बघितलं. तेवढ्यात मुख्याध्यापकांनी मला त्यांच्या केबिनमधे बोलावलं. मी थोडा घाबरलोच. माझ्या प्रार्थनेत काही चूक तर नव्हती ना ? असा विचार करतच मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. एक – दोन शिक्षकही माझ्यासोबतच त्यांच्या केबिनमध्ये आले होते. आईने स्वच्छ धुतलेला गणवेश नीट करत मी मुख्याध्यापकांसमोर उभा राहिलो. ते सहसा असे कुणाला केबिनमध्ये बोलवत नसत. त्यामुळे माझी धडधड थोडी वाढली होती. त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात मला विचारलं “तू सामोड्यात कुठे राहतोस ?” “इंदिरानगरच्या भिलाटीत. ”मी हळू आवाजात उत्तर दिलं. “तू कोणाचा मुलगा आहेस ? “त्यांनी दुसरा प्रश्न विचारला.

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading