मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड..(IAS) भाग २५.

“सर मी ग्रामपंचायत सदस्या कमलाबाई भारुड यांचा मुलगा आहे. ‘पालक’ म्हटलं, की मला आईच दिसत असे. त्यामुळे मी कोणाचा मुलगा आहे ? असं कोणी विचारलं, तर नकळत माझ्या तोंडून आईचंच निघायचं. “मला सांग तुझे वडील काय करतात ? त्यांचं नाव काय आहे ? “यावेळी मी गप्पच राहिलो. मी मनातल्या मनात त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर जुळवत होतो. तेवढ्यात माझे एक सरच माझ्या मदतीला आले. त्यांनीच मुख्याध्यापकांना माझे वडील माझ्या जन्माआधीच वारल्याचं सांगितलं. यावर मुख्याध्यापक थोडा वेळ विचार करत राहिले व नंतर माझ्याकडे पाहत मला म्हणाले “तुझ्या आईला निरोप दे, की मी आज त्यांना भेटायला घरी येणार आहे. माझी धडधड आणखीनच वाढली. मुख्याध्यापक घरी येण्याचं कोणतंही कारण त्यावेळी मला लक्षात येत नव्हतं. मी पुन: पुन्हा आठवत होतो, की माझ्या हातून काही चूक तर नाही ना झाली?

घरी आल्यावर मी हलक्या आवाजातच आईला मुख्याध्यापकांचा निरोप दिला. सर घरी येणार, याचं आईला नवल वाटलं. तिला वाटलं, की मी शाळेत कुणाची तरी खोडी काढली असणार आणि त्याची तक्रार करायला मुख्याध्यापक घरी येत असावेत. पण तिला माझ्यावर विश्वासही होता, की मी विनाकारण काहीही करणार नाही. त्यामुळे ‘ठीक आहे’ म्हणून ती आपल्या कामाला लागली. घरासमोर दारूसाठी जमलेल्या ग्राहकांना बघून मुख्याध्यापकांना अवघडल्यासारखं होईल म्हणून आईने त्या दिवशी दारूचं दुकान बंदच ठेवलं. संध्याकाळी सहाच्या सुमारास मुख्याध्यापक व बडगुजर सर पत्ता विचारत आमच्या घरी आले. आईने आधीच खाट टाकून त्यावर चटई अंथरली होती. मुख्याध्यापक व बडगुजर सरांनी आईला नमस्कार केला. आईने त्यांना बसायला सांगितलं व त्यांच्यासाठी चहा केला. त्यावेळी मी ताईसोबत मधल्या खोलीत ते काय बोलत आहेत हे कान टवकारून ऐकत होतो. थोड्या वेळाने बडगुजर सरांनीच मला बाहेर बोलावलं. मी निमूटपणे आईजवळ जाऊन उभा राहिलो. (I had a dream! Dr. Rajendra Bharud .. (IAS) Part 25.) मुख्याध्यापक बोलत होते “बाई, आज सकाळी मी शाळेत याला’ पसायदान ‘म्हणताना पाहिल. बसून याच्यासमोर गावातील श्रीमंत, प्रतिष्ठित लोकांची मुलं होती. त्यावेळी मलाही असंच वाटलं, की हा सुद्धा एखाद्या सुशिक्षित घरातल्या श्रीमंत बापाचा मुलगा असावा. याचे कपडेही फार स्वच्छ व नीटनेटके होते. त्याने जेव्हा सांगितलं की, तो भिलाटीत राहतो. तेव्हा मी थक्कच झालो. भिलाटीतील एक विद्यार्थी एवढा हुशार व सुसंस्कृत असू शकतो, यावर मी त्याआधी विश्वासच ठेवला नसता. बाई तुम्ही अशा वस्तीमधे राहूनही तुमच्या मुलावर फार छान संस्कार केले. तुम्ही याला खूप शिकवा. पुढे जाऊन हा खूप मोठा माणूस होईल. हा केवळ तुमचंच नाही, तर संपूर्ण भिलाटी व सामोड्याचं नाव मोठं करेल”. मुख्याध्यापक अगदी तळमळीनं बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून आई भारावून गेली होती. पदर डोळ्यांना लावत ती म्हणाली” तुमना पायना पुण्य मना पोऱ्या चांगला शिकी राइना. मी ते अडाणी बाई शे, माले त्ये मातरं कायीच समजसं नही. पण तो शिकी राइना त्येना त्येना जीववर. हाऊ पोऱ्या जर एखादा कुणबीना पोटले येता, तर बरं व्हतं. मी अडाणी रंडकी बाई त्येना करता कायीबी चांगलं करू शकत नही. पण तुमनासारखा मास्तरसनी त्यावर माया शे, म्हणून शाळंमा त्येना एक नंबर येस “एवढे बोलून आई गप्प झाली. तिला खूप बोलायचं होतं, पण तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

अंधार पडत असताना मुख्याध्यापक व बडगुजर सर परत जायला लागले तेव्हा आईनं मला त्यांचा पाया पडायला सांगितलं. घरात कुणी मोठे आले, की आई न चुकता मला त्यांच्या पाया पडायला सांगत असे. ती नेहमी सांगायची, की मोठ्यांसमोर नम्र असलं पाहिजे. मी मुख्याध्यापकांचा पाया पडत होतो, तेव्हा ते म्हणाले, “चांगला अभ्यास कर. शिकून मोठा हो. आपल्या आईचं दुःख दूर कर मला नेहमीच असं वाटतं, की मी इथवर आलो ते त्यांच्यासारख्या अनेक संवेदनशील माणसांच्या आशीर्वादामुळेच.

अशाच वातावरणात नवीन शाळेतील दिवस जात होते. एकदा कार्यानुभवच्या तासाला घरटे सर वर्गात आले. त्यांनी सांगितले की ‘नवोदय’ची परीक्षा आहे आणि त्यासाठी फॉर्म भरायचे आहेत. पण सरांकडे दोनच फॉर्म होते…

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading