हाऊसमध्ये सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी असत. सहावीच्या मुलांना आपापल्या हाऊसमध्ये स्वतंत्र बेड दिले जाणार होते. पण, रॅगिंगच्या भीतीने सुरवातीला आम्हाला डॉर्मिटरीत झोपायला सांगण्यात आले. डॉर्मिटरीत दोनताली दहा पलंग होते. वीस मुलांच्या राहण्याची सोय तिथे होती. पण सहावीसाठी जवळपास ४० मुलांना प्रवेश मिळाल्यामुळे काही दिवसांसाठी खालच्या प्रत्येक पलंगावर दोन – दोन मुलांना झोपावं लागणार होतं. माझ्यासोबत प्रदीप जाधव नावाचा मुलगा बेड शेअर करणार होता. तो माझ्या आधीपासून तिथे राहत होता.
मी हाऊसमध्ये गेलो तेव्हा गेल्या – गेल्याच त्याने माझ्यावर सूचनांचा भडिमार केला. “तुला खाली झोपावं लागेल. तुझं सामान तिथेच ठेवावं लागेल. माझ्या बेडवर पाय ठेवायचा नाही. पुस्तकं तिकडे ठेवायची. माझं बेडशीट मळता कामा नये” वगैरे वगैरे. मी काही दिवस ते सगळं निमूटपणे ऐकून घेतलं. पण पुढे – पुढे मला त्या सूचनांचा प्रचंड वैताग येऊ लागला. नवीन आलेल्या मुलांनाही प्रदीप जाधव’ व्याख्यानमाले’चा कंटाळा आला होता. मग मी खास आमच्या भिलाटी स्टाइलने त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं. सर्व मित्रांना मी सांगितलेली योजना प्रचंड आवडली.

त्या रात्री ठरल्याप्रमाणे आम्ही झोपेचं सोंग घेऊन बेडवर पडून होतो. प्रदीप जाधवला गाढ झोप लागल्याची खात्री झाल्यावर एका मित्राने त्याचा उजवा पाय वरच्या बेडला बांधला. तोपर्यंत आम्ही तोंडाला भरपूर पावडर फासून तयार झालो. एकाने बाहेर जाऊन लाईटचं मेन स्वीच बंद केलं, तसं संपूर्ण होस्टेल अंधारात बुडालं. आम्ही मग त्याच्या बेडभोवती चौफेर जमलो. प्रत्येकाने आपापल्या खिशातील टॉर्च काढून स्वत: च्या चेहऱ्यावर धरली. आणि मग अक्राळविक्राळ चेहरे करून आम्ही प्रदीपला गुद्दे मारत उठवणं सुरू केलं. तो खडबडून जागा झाला. जिभा बाहेर निघालेले काही पांढरेफटक भेसूर चेहरे बघून त्याची भीतीने गाळण उडाली. तो बेडवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. पण पाय बांधलेला असल्याने त्याला बेडवरून पळून जाता येत नव्हते. त्यामुळे तो अधिकच घाबरला. “भूतऽऽ भूतऽऽ भूतऽऽ’ असं करत त्याने मोठमोठ्याने किंचाळायला सुरवात केली. दोन – तीन मिनिटं हा गोंधळ सुरूच होता. एकाने मग बाहेर जाऊन लाईट सुरू केले. तेव्हाच त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. संपूर्ण हाऊस त्याच्याकडे पाहून खो – खो हसत होतं. मी दाखविलेल्या“ सामोडे हिसक्यानंतर मात्र त्याने पुन्हा कधीच त्रास दिला नाही. भविष्यात तर तो माझा खूप चांगला मित्र बनला. त्याच्या वागणुकीत झालेला बदल बघून माझे मित्र म्हणतः “प्रदीपला ही जामखेडी नदीची मात्रा एकाच दणक्यात चांगली लागू पडलेली दिसते.
”माझ्या हाऊसमध्ये त्यावेळी सहावीची आठ – दहा मुलं होती. त्यापैकी बहुतेक मुलं माझ्यासारखीच खेडेगावातून आलेली होती. आम्ही सगळे खूप मिळून मिसळून राहायचो. आमचे शिक्षकही आमच्यावर प्रेम करायचे. आमची काळजी घ्यायचे. अनंतकुमार चौगुले आमचे पी.टी. शिक्षक होते. सर मूळ कोल्हापूरचे होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात व्यक्तिमत्त्वात एक रांगडेपणा होता. आवाजात जरब होती. आम्हाला ते मॉडेल, एनसीसी, स्काऊट गाईडचं प्रशिक्षण देत असत. खेळांबरोबरच संगीत, नाटक, कथालेखन यामध्येही ते पारंगत होते. आम्हालाही मग त्या विषयांमध्ये गोडी निर्माण झाली. पवार सर आमचे वर्गशिक्षक होते. ते आम्हाला हिंदी शिकवायचे. रामायणातील गोष्टी सांगायचे. पवार सर म्हणजे आमचे शिक्षक कमी आणि पालक जास्त होते. त्यापेक्षाही जास्त म्हणजे ते आमचे मित्रच होते. ते आमची खूप काळजी घेत असत. बाहेरून काही मागवायचं असलं, की आम्ही विश्वासाने पवार सरांना सांगायचो. ते आठवणीने त्या वस्तू बाजारातून घेऊन येत असत. इंग्रजी सोडून मला अन्य कोणत्याही विषयाची भीती वाटत नसे. मात्र इंग्रजीच्या मॅडम वर्गात प्रश्न विचारत असत तेव्हा मला खूप संकोच वाटत असे. इंग्रजीची एक अनामिक भीती माझ्या मनात दडलेली होती. आमच्या वर्गातील बहुतेक मुलांचं इंग्रजी उत्तम होतं. मला मात्र ‘एबीसीडी…’ व काही इंग्रजी कविता याव्यतिरिक्त बाकी काहीच येत नसे. मॅडम जेव्हा शब्दांचे अर्थ विचारायच्या तेव्हा उत्तर देता येत नसल्याने मला फार वाईट वाटायचं.(I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS), Part 30)
‘एमबीबीएस’ करत असताना मी प्रयत्नपूर्व इंग्रजीच्या भीतीवर मात केली. इथले सर्व शिक्षक आम्हाला नावानिशी ओळखत. ते नेहमी सर्वांची आस्थेने चौकशी करत. इतर मुलांच्या पालकांप्रमाणे माझी आईसुद्धा मला भेटायला येत असे. ती आली, की मला खूप आनंद व्हायचा. पण परत गेल्यावर उदास वाटत राहायचे. बरेच शिक्षक तर आता आमच्या पालकांनाही ओळखू लागले होते. त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांच्या आनंद आणि दुःखात एका मोठ्या कुटुंबाप्रमाणेच राहत होतो. आमच्या शिक्षकांचा उत्साह इतका दांडगा असायचा, की आम्हाला कधीच कशाची कमतरता जाणवत नसे. एकंदरीत माझा शिक्षणप्रवास वेगाने सुरू होता.”…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
