‘सातपुडा हाऊस’च्या आठवणी आमच्या मेसची इमारत बरीच जुनी होती. आम्ही जेथे जेवण करायचो तिथे मुलांची फार गर्दी होत असे. कधी – कधी स्वयंपाकाला उशीर व्हायचा तर, पोटात कावळे ओरडत असलेली मुलं, मग जेवणावेळी खूप ढकला – ढकली करत.
त्यावेळची एक घटना मला अजूनही स्पष्ट आठवते. मेसमध्ये मुलं जमली होती. गर्दी वाढल्यामुळे गोंधळही वाढतच होता. पण तिथला नियम असा होता, की आमचे एम.ओ.डी. हजर असल्याशिवाय जेवण वाढलं जात नसे. त्या दिवशी टंडेल सर एम.ओ.डी. होते व त्यांना तिथे यायला थोडा उशीर झाला. ज्यावेळी टंडेल सर तिथे आले, तोपर्यंत तर मुलांचा गोंधळ खूपच वाढला होता. टंडेल सर खूप शिस्तप्रिय होते. तिथला तो गोंधळ त्यांच्या शिस्तीत अजिबात बसणारा नव्हता. मुलांचं ते वागणं पाहून त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. रागाच्या भरात त्यांनी मुलांना जोराने मागे ढकललं. ते मलाही ढकलतील याचा मुळीच अंदाज नसल्याने मी धाडकन् बाजूला पडलो. माझ्या हातापायाला खरचटलं; मला बऱ्यापैकी मार लागला. हा सर्व प्रकार माझ्यासाठी अनपेक्षित होता. त्यांच्या अशा वागण्याने मी भेदरलोच. जेवण न करताच मी रडत – रडत माझ्या खोलीत परत आलो. मला मार लागला यापेक्षा, त्यांनी मला ढकललं, याचं खूप वाईट वाटलं. उशीत डोकं खुपसून मी रडतच होतो. तेवढ्यात मला माझ्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला. मी वर बघितलं, तर टंडेल सर स्वतः आपल्या हातात जेवणाचं ताट धरून तिथे उभे होते. माझ्या खांद्यावर हात ठेवून ते हळूवार आवाजात बोलले “बेटा, हम भी तुम्हारे माँ – बाप जैसेही है । लेकीन तुम भी फिर कभी ऐसी गलती मत करना । खाने की जगह फिर कभी दंगा नहीं करना । आज मुझसे भी गलती हो गई । मुझे तुम्हे इतनी जोर से धक्का नहीं देना चाहिए था । “टंडेल सर गहिवरून बोलत होते. त्यांचं असं प्रेमळ बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं. टंडेलसरांचं लक्ष माझ्या खरचटलेल्या हाताकडे गेलं. त्यांनी स्वतःच माझी जखम स्वच्छ करून त्यावर मलम लावलं. नंतर आग्रहाने मला जेवायलाही लावलं. वडील कसे असतात, हे मी कधीच अनुभवलं नव्हतं; पण त्या दिवशी टंडेल सरांकडे बघून वाटलं, की प्रत्येक मुलाच्या जीवनात वडिलांची भूमिका टंडेल सरांसारखीच असावी – चुकलं तेव्हा कठोर होणारे व गरज असते तेव्हा आधार देणारे. त्यांच्या रूपाने आई – वडिलांपासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालकाची भूमिका निभावणारा शिक्षक मी प्रथमच पाहत होतो. त्या प्रसंगानंतर आमचे संबंध नेहमीच छान राहिले.

सर गुजरातचे असल्याने त्यांना मराठी बोलता येत नसे. मात्र, गुरू – शिष्याच्या नात्यात भाषेचा अडसर कधीच आला नाही. या प्रसंगामुळे तर मला एक गोष्ट कळली, की रागावणारा प्रत्येकच शिक्षक काही खाष्ट नसतो. विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण रुजविण्यासाठी त्यांच्यावर गुरूच्या अधिकाराने रागावणाऱ्या शिक्षकांविरुद्ध जेव्हा काही पालकांना मी तक्रार करताना बघतो, तेव्हा त्यांच्या संकुचित वृत्तीची मला नेहमीच कीव येते.
आता “नवोदय’ मधली दिनचर्या माझ्या अंगवळणी पडली होती. होस्टेलच्या मुलांमध्ये मी बऱ्यापैकी रुळलो. आमच्या सातपुडा हाऊसमध्ये मला महेंद्र शिंदे, सुशील जावरे, विकास पाटील यासारखे जिवाभावाचे मित्र भेटले. आम्ही सर्व एकमेकांना अगदी भावासारखे सांभाळून घेत होतो. आमच्या हाऊसबाहेरही मला बरेच चांगले मित्र भेटले. नथ्थू कुंभार, संदेश सोंजे यांसारख्या जीवलग मित्रांमुळे माझा मित्रपरिवार समृद्ध झाला. (I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS), Part 31.)
‘नवोदय मध्ये असतांना वेगवेगळया हाऊसेसमध्ये इंटरहाऊस स्पर्धा होत असत. त्यावेळी खूप गमतीजमती घडत. आम्ही स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी उतावीळ असायचो. नाटक, वादविवाद, नृत्य, कथाकथन व विविध क्रीडाप्रकार यासारख्या अनेक स्पर्धा तिथे होत असत. त्यावर्षी सहाव्या इयत्तेसाठी इंग्रजीमधून कथाकथनाची स्पर्धा होती. सातपुडा हाऊसमधून माझी निवड झाली होती. इंग्रजीमधून कथाकथन करण्याची माझी पहिलीच वेळ होती. कथाकथनाच्या विषयाचे नाव ‘छोटू अँड मोटू’ असे होते. कथा तशी आमच्या पाठ्यपुस्तकातीलच होती. मी चार – पाच दिवस मन लावून सराव केला. पण, माझी इंग्रजी अगदीच सुमार होती. त्यावेळी माझ्या उच्चारावर भिलाटीतील संस्कार असल्याने इंग्रजीतील शब्दांचे मी भलतेच उच्चार काढत असे. स्पर्धेचा दिवस उजाडला. माझ्याआधी तीन स्पर्धकांनी आपापलं कथाकथन सादर केलं. त्यांचे स्पष्ट उच्चार व फाड – फाड इंग्रजी बघून माझ्या मनात धडधड सुरू झाली. शेवटी माझा नंबर आला. एका जाड व एका बारीक माणसाची ती कथा होती. त्या जाड व बारीक माणसांची मी हुबेहूब नक्कल करत…
क्रमश
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
