मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड.(IAS),भाग ३८.

‘सीईटी’मधील उत्तुंग यश

माझ्या शिक्षणासाठी आईने खूप कष्ट केले. माझ्या शिक्षणात काही अडथळा येऊ नये म्हणून, ती आयुष्यभर घाम गाळत राहिली. मजुरीवर जाणे, दारू विकणे यासोबतच गावातील मुकादम म्हणूनही तिने काम पाहिलं. खरं तर आमच्या सामोडे गावात आधी एक मुकादम होता. मुकादम म्हणजे मजुरांना एकत्र करून, त्यांना कामावर घेऊन जाणारा. मुकादमामुळे मजुरांना रोजगार मिळत असे व कारखानदारांना मोठ्या संख्येने लागणाऱ्या मजुरांचा पुरवठा होत असे. मजुरांचा पुरवठा करण्याच्या बदल्यात कारखानदाराकडून मुकादमाला मजुरांच्या कामाच्या टक्केवारीनुसार पैसे मिळत असत. मुकादमाच्या सांगण्यावरून रोजगार मिळत असल्याने मजुरांमध्ये मुकादमाला मान होता. विशेष अदबीने मजूर त्याच्याशी वागत. पण गावातील एका मुकादमाचा व्यवहार नीट नसल्याने त्याच्या हिशेबाचा ताळमेळ बसत नसे. अखेरीस त्याचा धंदा डबघाईला आला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्याच वेळेस इतर लोकांच्या सांगण्यावरून व मामांच्या आग्रहास्तव माझ्या आईने मुकादमाचा व्यवसाय सुरू केला. ऊसतोडणीच्या कामासाठी साखर कारखानदारांना मनुष्यबळ पुरविण्याच्या बदल्यात कारखानदार आईला पैसे देणार होते. आईने सुरवातीला दहा कोयत्यांची एक तुकडी गुजरातमध्ये पाठविली. एक ‘कोयता’ म्हणजे दोन माणसं. अशा प्रकारे साधारणपणे वीस माणसं बायका त्यांच्या लेकरांसह सहा महिन्यांसाठी गुजरातमध्ये गेले. ऊसतोडणीवेळी मजुरांना उत्तम मजुरी मिळाली. त्यांनी तोडलेल्या उसाचे प्रतिटनानुसार टक्केवारीने आईलाही पैसे मिळाले. आता कारखानदारांनी आईला कर्ज देणे सुरू केले होते. त्या कर्जाच्या पद्धतीला देडी म्हणत. देडी म्हणजे कर्ज घेतल्यावर ते ठरलेल्या वेळेत परत करताना दीडपट रक्कम परत करणे. आई कारखान्याकडून कर्ज घेऊन त्याच दराने मजुरांना वाटत असे. त्यामुळे अडचणींच्या वेळेस मजुरांना पैशाची मदत होत असे. या पद्धतीमुळे दहा कोयत्यांपासून सुरू झालेला हा व्यवसाय पुढे वीस, तीस आणि मग रेंशी ते शंभर कोयत्यांपर्यंत पोहोचला. एकाच वेळी मोठ्या संख्येने मजूर जात असल्यामुळे टक्केवारीचे पैसे बऱ्यापैकी मिळत होते. भाऊ या कामात आईला मदत करत असे. पण पुढे मी “एमबीबीएस’ करत असताना या व्यवसायालासुद्धा उतरती कळा लागली. मजुरांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम मिळेनाशी झाली. त्यामुळे कारखान्याकडून कर्जही मिळेनासे झाले. आणि एकवेळ अशी आली की आईला मुकादमाचा व्यवसाय कायमचा बंद करावा लागला.

भाऊ आणि मी एकाच वर्षी १२ वी पास झालो होतो. मी ‘नवोदय मधून पहिला आलो होतो. पण घरी त्याची काहीच कल्पना नव्हती. मी पास झालो हेच सर्वांसाठी महत्त्वाचं होतं. भाऊ दहावीत असताना सुकापूर केंद्रातून पहिला आला होता. पण १२ वीच्या वेळी त्याला कामात लक्ष द्यावं लागत असल्यामुळे ६५ % गुण मिळाले होते. त्यालाही पुढे शिकायचं होतं. बी.एस्सी. करण्याची त्याची इच्छा होती. त्यासाठी पुन्हा बाहेर राहावं लागलं असतं. पण एकावेळी दोघांच्या शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे त्याने पिंपळनेरलाच डी.एड्.साठी प्रवेश घेतला व आईला मुकादमाच्या कामात मदत करू लागला. छातीवर दगड ठेवूनच त्याने हा निर्णय घेतला आहे, हे घरी सर्वांनाच कळत होतं. पण घरची परिस्थितीच अशी होती, की खर्चाची चिंता करू नकोस, तू पुढे शिक ‘असं कुणी त्याला म्हणूशकत नव्हतं. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-38

मी मात्र, इकडे दुसऱ्याच काळजीत होतो. मला गणितात दहावीला ९५ टक्के तर बारावीला ९३ टक्के गुण मिळाल्याने मला इंजिनिअरिंगला जावं, असं वाटत होतं. जीवशास्त्राचा मला कंटाळा येत असल्याने आपण बी.एस्सी. करावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. १२ वीत मी त्या विषयाचा विशेष अभ्यास केल्याने मला जीवशास्त्रातही चांगले गुण मिळाले होते, पण तो विषय मला कधीच आवडला नव्हता. मी सहसा जीवशास्त्राचा अभ्यास करत नसे. पण जेव्हा मी जीवशास्त्रात चांगले मार्क्स मिळविण्यासाठी जीव तोडून अभ्यास करू लागलो, तेव्हा माझे मित्र गमतीने मला चिडवत, की कादंबरीत जीव ओतणारा राजू आजकाल जीवशास्त्र वाचू लागला आहे. त्याने काही जडीबुटी तर खाल्ली नाही ना! पण तोपर्यंत मला कळून चुकले होते, की आपल्याला एखादा विषय आवडत नाही, कारण तो आपल्याला समजत नाही. एकदा का तो विषय आपल्याला चांगला समजला, की तो न आवडण्याचं कारणच उरत नाही. पण न समजणारा विषय समजून घ्यायला मेहनत जास्त करावी लागते, हे मात्र खरं…

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading