बारावीच्या निकालानंतर आईने सांगितल्याप्रमाणे मी नूतन शाळेचे प्राचार्य देवरे सरांना भेटायला गेलो. मी त्यांना पेढे देऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते लगेच बोलले, की तू आता मेडिकलसाठी प्रयत्न कर! मी त्यांना सांगितलं, की मला इंजिनिअरिंगला जावंसं वाटतंय. त्यावर मला समजावत ते म्हणाले, की ‘तू जर इंजिनिअर झालास, तर केवळ तुझा आणि तुझ्या घरच्यांचा फायदा होईल; पण जर का तू डॉक्टर झालास, तर संपूर्ण समाजाला व गोरगरीबांना त्याचा फायदा होईल. शिवाय डॉक्टर झाल्यानंतर तू लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही सहज पास होऊ शकशील. तू तुझ्या आईचे स्वप्नही पूर्ण करू शकशील. ‘सरांना भेटून घरी परतताना माझ्या मनात सतत विचार येत होते, की मेडिकलमध्ये सहा वर्षे घालवून आधी डॉक्टर होऊन लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देणं कितपत योग्य ठरेल. शिवाय मेडिकलसाठी चांगला क्लास लावावा लागणार होता. घरची परिस्थितीही मला माहीत होती . हा खर्च आईला झेपू शकेल का? चांगले मार्गदर्शन मिळणेही तेवढेच आवश्यक होते. काय करावं? मला काहीच सुचत नव्हतं. स्पर्धा परिक्षांची तयारी तर मी इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यानंतरही करू शकतो.
भाऊने मात्र माझ्यासाठी पैशांची जमवाजमव सुरू केली होती. त्याला मनापासून वाटत होतं, की चांगला मोठा अधिकारी होऊन घराचं व भिलाटीचं नाव मी मोठं करावं. माझ्यासाठी त्याने स्वत:च्या शिक्षणाचा खर्च कमी केला. तो आईला नेहमी म्हणत असे, की ‘आता आपण सर्व खर्च राजूच्या शिक्षणावरच करू. ‘मी माझ्या विचारात असतानाच मला ‘नवोदय’मधील हरिष पाटील सरांचा फोन आला. ते आता जळगावला एका खासगी क्लासमध्ये को – ऑर्डिनेटर म्हणून काम करत होते. त्यांना मी ‘नवोदय’मधून प्रथम आल्याची बातमी कळली होती. शिवाय माझ्या घरची परिस्थितीही त्यांना माहीत होती. ते मला म्हणाले, की तू आधी जळगावला ये. मी तुझ्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करतो. नंतर आपण पुढे काय करायचं ते ठरवू. ‘त्यावर मी जेव्हा आईला जळगावला जाण्याची परवानगी मागितली तेव्हा तिने मला होकार दिला. आईला माझ्यावर खूप विश्वास होता. तिला शक्य असलं, तर ती मला कोणत्याच गोष्टीसाठी नकार देत नसे. फक्त मला किती पैसे हवे’, हे विचारून ती त्याची जमवाजमव करायला सुरवात करत असे. आईने बँकेत काही पैसे जमा केले होते. तिने आणखी काही पैसे उधार घेऊन ते मला दिले व मी जळगावला जाण्याची तयारी करू लागलो.

मी जळगावला पोहोचलो तेव्हा तिथे भुसावळ ‘नवोदय’मधील नीरज पाटील, जितेंद्र महाजन, गिरीश भोसले हे आधीच आलेले होते. सरांनी माझं अभिनंदन केलं. सरांनी आम्हाला आधी चांगला अभ्यास करून मेडिकल एन्ट्रंस एक्झाम पास होण्याचा प्रयत्न करायला सांगितलं. मी नीरज व अन्य मुलांसोबतच एक रूम शेअर केली होती. आम्हाला बघून सरांच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले होते. त्या दिवशी सरांनी अॅकॅडमीच्या स्टाफसोबत मिळून तिथे आलेल्या रिपीटर बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी आपला एक वेगळा क्लास उघडायचा विचार व्यक्त केला. नंतर मला भेटून ते म्हणाले, की तुझ्यापासून माझ्या नवीन फाऊंडेशनची सुरवात होणार आहे. त्यांनी तिथे असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर आपल्या नव्या व स्वतंत्र क्लासच्या स्थापनेची घोषणा केली. त्या क्लासच्या पहिल्या बॅचमध्ये आम्ही ४० ते ५० विद्यार्थी होतो. सर्वांनी होस्टेलमध्ये राहायचं ठरवलं. बहुतेक मुलं भुसावळ ‘नवोदय’ची होती. केवळ मी व महेंद्र बोरसे आम्ही दोघेच अक्कलकुव्याचे होतो. होस्टेलच्या शेजारीच घरगुती मेस होती. १२ वीला सीबीएससी बोर्ड असल्यामुळे आम्हाला स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम थोडा जड जायचा. आमचा अभ्यासक्रम स्टेट बोर्डपेक्षा खूप विस्तारीत होता. पण स्पर्धा परीक्षा म्हटली, की अभ्यासाएवढेच आपल्या दृष्टिकोनालाही तेवढंच महत्त्व असतं, हे मला आता हळूहळू कळू लागलं होतं. त्यामुळे मी बऱ्याच नवनव्या संकल्पना समजून घेत होतो. अन्य विद्यार्थीही मला यासाठी खूप मदत करायचे. सरांना आमच्या बॅचकडून खूपच अपेक्षा होत्या. आमच्या बॅचच्या निकालावरच त्यांच्या अॅकॅडमीचं भविष्य अवलंबून होतं. म्हणून त्यांनीही आम्हाला शिकविण्यासाठी अनुभवी प्राध्यापकांना बोलावलं होतं. क्लास संपल्यावर सर आम्हाला ते कसे शिकवितात, यावरच्या प्रतिक्रिया विचारत. एखाद्या शिक्षकाविषयी आमची प्रतिक्रिया चांगली नसल्यास ते त्यांना बदलून नवीन शिक्षकांना बोलवत, फिजिक्ससाठी तर त्यांनी पाच वेळा शिक्षक बदलले होते. सर मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे. ते म्हणायचे, की ‘तू जर मेहनत घेतलीस, तर तुला सरकारी एमबीबीएस कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळेल. तू हे सुद्धा लक्षात ठेव, की आपल्या क्लासचे भविष्य आता तुझ्या हातात आहे. तुला चांगल्यातल्या चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा आहे. सर्व समजत असूनही माझ्या मनाचे समाधान होत नव्हते. त्यातल्या त्यात मला एवढेच समाधान होते, की मी माझ्या सरांचा विश्वास सार्थ केला व त्यांचा शिष्य म्हणून त्यांना माझा अभिमान वाटतो. त्या दिवशी मी माझ्या यशाचा आनंद स्वत: सोबत व भगवंतासोबतच साजरा केला. त्या दिवशी दिवसभर देवाचं नाव घेत होतो. मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणत होतो. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात पाठीवर हात ठेवून धीर देणारा कुणीतरी हवा असतो. त्याहीपेक्षा जास्त म्हणजे त्याला समजून घेणारा हवा असतो. माझ्या घरी सर्वांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. पण माझ्या महत्त्वाकांक्षांचा आवाका त्या भोळ्या माणसांच्या अपेक्षेपलीकडचा होता. त्यामुळे मला कोणीतरी असा हवा, असे ज्याला मी माझ्या मनातलं सांगू शकेन आणि जेव्हा माझ्या आजूबाजूला असं कोणीच सापडलं नाही तेव्हा नकळतच मी ईश्वराच्या अधिकाधिक जवळ जाऊ लागलो. माझ्या मनात देवाविषयीची श्रद्धा वाढतच होती. मला नेहमी असं वाटत असे, की या गरीब लोकांच्या जीवनात प्रकाश पसरविण्यासाठी देवच मला मार्गदर्शन करत आहे. माझ्या या गुणांच्या बळावर मला महाराष्ट्रातील कोणत्याही सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळणार होता. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-39
मला कौन्सिलिंगसाठी औरंगाबादच्या घाटी वैद्यकीय महाविद्यालयात जायचं होतं. त्यामुळे मी तिथे लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करू लागलो. मला आता फक्त माझी ‘सीईटी’ची मार्कशीट परतूरच्या ‘नवोदय’मधून आणायचे होती. परतूरला गेलो, तेव्हा सर्व शिक्षकांनी माझं अभिनंदन केलं. एक चांगला डॉक्टर हो! अशा शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. बराच उशीर झाला असल्याने मी त्या दिवशी नवोदय’लाच मुक्काम करायचं ठरविलं. सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून मी रात्री लवकरच झोपलो. औरंगाबादच्या घाटी वैद्यकीय महाविद्यालयात मला सकाळी अकराच्या आत पोहोचायचं होतं. पण परतूरहून औरंगाबादला जाणारी गाडीच तिथं साडे अकराच्या सुमारास आली. घाटी कॉलेजमध्ये जाता जाता मला साडे बारा वाजून गेले. धावत – पळत आलो असल्याने घामाने चिंब झालो होतो. डोक्यावरचे केसही विखुरले होते आणि माझा शर्टही प्रवासाने मळकट झाला होता. त्या पॉश वातावरणात मीच तेवढा अपवाद होतो. तशाच अवतारात मी एका बाहेरच्या काऊंटरवर बसलेल्या एका माणसाला माझा नंबर कधी येणार, हे विचारलं. त्याने एकवार माझ्याकडे रागाने पाहिलं व माझ्यावर जोराने खेकसत बोलला – आता…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
