मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS),भाग ४०.

“एवढा उशीर का झाला? कौन्सिलिंग सुरू होऊन एक तास झाला आणि तू आता आला. इथे काय तू एकटाच विद्यार्थी आहेस काय? तुला काही काळजी आहे की नाही? ‘तो कितीतरी वेळ मला रागवतच होता. मी त्याला माफी मागत उशीर होण्याचं कारण सांगितलं. शेवटी आवश्यक ती कागदपत्रे जोडून लवकरात लवकर फॉर्म भरून त्यांच्याकडे दिला. पण, आता माझ्यासमोर नवीनच पंचाईत होती. माझ्याकडे सर्व ओरिजनल कागदपत्रे होती. त्यांच्या झेरॉक्स काढायला मला वेळच मिळाला नव्हता. मी भीतभीतच त्याच माणसाला झेराक्स मशिन कुठे आहे, हे विचारलं. त्यावर तो आणखीनच भडकला. “काय कुठून जंगलातून आला आहेस का? सर्व कागदपत्रांच्या आधीच झेरॉक्स काढून त्या अटेस्टेड करून घ्यायच्या एवढंही तुला कळत नाही? “त्याचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटत होतं, पण ऐकून घेण्यावाचून दुसरा पर्यायही नव्हता. झालेला अपमान गिळत व आलेल्या संतापाला दाबत मी तिथून बाहेर पडलो. बाहेर एका शिपायाला झेरॉक्सबद्दल विचारलं. कॉलेजपासून बाहेर एक – दोन किलोमीटरवर एक दुकान असल्याचं शिपायाने सांगितलं. जाऊन परत येईपर्यंत बराच उशीर झाला होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

आता माझ्यासमोर आणखी एक समस्या होती. ती म्हणजे ती सर्व कागदपत्रे अटेस्टेड करण्याची. ते कुठे अटेस्टेड करतात, मला काहीच माहीत नव्हतं. शेवटी मी पुन्हा त्याच शिपायाकडे गेलो अन विचारलं, “काका, मी झेरॉक्स तर आणल्या आहेत, पण ते अटेस्टेड कुठं करतात मला काहीच माहीत नाही. कृपया तुम्ही माझी थोडी मदत कराल का? “आलो त्या शिपाईकाकांना माझी दया आली. त्यांनी मला मी कुठून वगैरे विचारपूस केली व शेवटी एका विभागप्रमुखाकडे घेऊन गेले. तिथेही काही बोलायची माझी हिम्मत होत नव्हती. शेवटी शिपाईकाकांनीच सरांना सांगितलं, की हा एका खेड्यातून आलेला आहे आणि सोबतही कोणी नाही. कौन्सिलिंगला आधीच खूप उशीर झाला आहे, असं म्हणून त्या शिपाईकाकांनीच स्वत: विनंती करून सरांकडे सही मागितली. त्या कागदपत्रांवर शिक्केही त्यांनी स्वत:च मारले. माझ्या कागदपत्रांवरून नजर टाकत सरांनी मला मी कोणत्या कॉलेजला “प्राधान्य देणार, हे विचारलं. मी त्यांना म्हटलं “मुंबईच्या शेठ जी. एस. कॉलेजला. “त्यांनी माझे ‘सीईटी’तील मार्क्स पाहिले व अविश्वासाने माझ्याकडे पाहत विचारलं, “तू खरोखरच एस. टी. कॅटेगिरीचा आहेस, की कुठून बोगस कागदपत्रे बनवली आहेस? कारण मी आजपर्यंत कधीच एस. टी. कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला एवढे गुण मिळालेले पाहिले नाही.’ त्यावर मी त्यांना थोडक्यात माझ्याविषयी सांगितलं. त्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं व न राहवून ते म्हणाले “तू आमच्याच कॉलेजमध्ये प्रवेश का घेत नाही? तुझा खर्चही कमी होईल व इथून तुला तुझे गावही जवळ पडेल. यावर मी काहीच बोललो नाही. शेवटी त्यांनी मला विचार करून निर्णय घे’ असं म्हणून ती कागदपत्रे माझ्या हातात दिली. त्यांना थेंक यू’ म्हणून मी बाहेर पडलो.

आता हॉलमधील गर्दीही बरीच कमी झाली होती. मी पहिल्या काऊंटरवर गेलो व माझं नाव व रँक सांगून कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. माझा रक ऐकून अचानक सर्वजण माझ्याकडे अविश्वासाने व विचित्र नजरेनं बघू लागले. माझ्या अवताराकडे बघून मी राज्यातून पाचवा आलो, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्या काऊंटरवरच्या माणसाने माझी कागदपत्रे बघितली. मी घाईघाईत ती जोडल्याने त्यांचा क्रम चुकला होता. तेवढ्याशा चुकीसाठी त्या माणसाने’ तू एस. टी. कॅटेगरीचा विद्यार्थी का? ‘असे बोलून अतिशय घाणेरड्या शब्दांत सर्वांसमोर माझा अपमान केला. मला अपमान गिळायची सवयच होती. तरीही ते शब्द काट्यासारखे माझ्या मनात सलत राहिले. माझ्या डोळ्यांत पाणी आलं. कधी एकदा ही प्रक्रिया संपवून गावाला जाणारी गाडी पकडतो, असं मला झालं होतं. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-40

बसमध्ये बसल्यावर मला थोडं बरं वाटलं. डोळे मिटून मी आज घडलेल्या सर्व घटनांचा विचार करत होतो. लहानपणापासून अगदी सामोड्याच्या शाळेपासून ते पुढे ‘नवोदय’ व त्यापुढे जळगावच्या क्लासमध्ये जाईपर्यंत मी माझ्या बुद्धिमत्तेच्या व मेहनतीच्या जोरावर कधीच कोणाला माझी उपेक्षा करायची संधी दिली नाही किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने अशारीतीने माझी उपेक्षा केली नाही. त्याउलट गरिबीतून वर येऊ पाहणारा, एक धडपडणारा विद्यार्थी म्हणून माझी मदतच केली. माझा समाज, माझी गरिब, माझं राहणीमान यावर इतक्या टोकाला जाऊन कधी कोणी व्यंग केलं नव्हतं. पण आज मात्र मी माझ्या गुणवत्तेच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केल्यानंतरही काही लोकांनी केवळ माझा समाज व माझ्या बाह्य रूपाकडे पाहून माझा अपमान केल्याचं मला खूप वाईट वाटत होतं. बसमधून खिडकीबाहेर बघताना मला आपल्या समाजाचा तो विकृत चेहरा दिसू लागला, जिथे माणसाचं मूल्यांकन त्याच्या गुणवत्तेवरून नाही, तर त्याच्या दिखाऊपणावरून केलं जातं. अशी खुज्या मनाची माणसं माझ्यासमोर आली, की मला त्यांची किळसच येते. पण आणखीखोलात जाऊन विचार केला तेव्हा मला जाणवलं की, मला खरं तर त्यांची कीव येत होती. कारण त्या लोकांकडे केवळ दिखाऊपणा आहे, जो मी केव्हाही मिळवू शकतो. पण माझ्याकडे जे आहे ते मिळविणे मात्र, त्या विचारहीन माणसांच्या आवाक्यापलीकडची गोष्ट आहे. याच विचारात असताना गाव कधी आलं ते मला कळलंच नाही.”

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading