मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड (IAS), भाग ४३.

लोकांनीदेखील कधी जातीवरून माझी क्षमता लेखली नव्हती. स्वत:ला आधुनिक म्हणवून घेणाऱ्या या पांढरपेशांना मात्र अजुनही त्या जाती – पातीच्या कुंपणापलीकडे बघता येत नव्हतं. पण एवढ्या मोठ्या प्रोफेशनल मेडिकल कॉलेजमध्येही एवढ्या संकुचित मनोवृत्तीची माणसं असावीत, याचंच मला आश्चर्य वाटलं. त्या कॉलेजमधील माझ्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीत मला बऱ्याचदा अशा मनाला झोंबणाऱ्या अपमानाला सामोरं जावं लागलं. मला जेव्हा – जेव्हा एस.टी. कॅटेगिरीची सवलत मिळत असे, तेव्हा तेव्हा इतरांच्या नजरेत माझ्याबद्दल तिरस्कार दिसायचा. मला आधीच १०० टक्के स्कॉलरशिप आणि पुढे चांगल्या गुणांमुळे खासगी स्कॉलरशिपसुद्धा मिळू लागली; तेव्हा तर अनेकांचा अगदी जळफळाट होत अस. तरीही मी स्वत:हून कधीच कोणाशी संबंध खराब होऊ दिले नाहीत. ती सर्वच्या सर्व वाईट किंवा तिरस्कार करणारी माणसं होती, असंही नाही.

https://bit.ly/bspmycityshrigonda

मी एमबीबीएस करताना सवलतीसंदर्भात मला आणखी दुसरी बाजू जाणवायची; ती म्हणजे दुर्गम भागातील गरीब आदिवासी, ज्यांच्यासाठी खरोखरच या सवलतीशिवाय मुख्य प्रवाहात येणं अशक्य असते, असे लोक त्यांच्या हक्कापासून वंचित राहतात. माझ्यासोबत असणाऱ्या या श्रीमंत व शहरी आदिवासींना केवळ आरक्षणच नाही, तर फी मध्ये सवलत, सरकारी शिष्यवृत्ती, लायब्ररीतील पुस्तकांसाठी सवलत अशा अनेक सोयी उपलब्ध होत्या. घरून कॉलेजमधे येताना चारचाकी वाहनातून येणाऱ्या मुलांसाठी ही स्कॉलरशिप म्हणजे केवळ पॉकेटमनी असे, जो बाहेर पार्ट्यामध्ये उडवला जायचा. आणि कधी काळी जर त्यांना विचारलं, की तुम्ही आदिवासी आहात का? ‘तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे असायचे, जणू त्यांना कोणी शिवीच दिली की काय! हे श्रीमंत आदिवासी कॅटेगिरीच्या नावाखाली विविध सवलती उपभोगतात, पण त्यांना स्वत:ला आदिवासी म्हणवून घ्यायला मात्र लाज वाटते. त्या सर्वांमध्ये खरोखर माझा सामाजिक स्तर, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि आर्थिक परिस्थिती मागास होती. पण माझ्या गुणांमुळे मला ओपन कॅटेगिरीमधूनच जागा मिळत होती. मात्र तरीही मी स्वत:ला आदिवासी म्हणवून घेण्यात कधीच लाजलो नाही.

उलट त्याचा अभिमानच बाळगला. पण इतर मुले, जी कमी गुणांमुळे व केवळ कॅटेगिरीच्या भरवशावर उत्तीर्ण झाले होते, त्यांना मात्र स्वत:ला आदिवासी म्हणवून घेण्यात लाज वाटत असे. मला असं मुळीच म्हणायचं नाही, की आपल्या जाती – जमातीचा व्यर्थ अभिमान बाळगायला हवा. पण ज्या जमातीच्या आरक्षणाच्या बळावर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांमुळे आपल्याला या सुविधा मिळत आहेत त्यांची थोडी जाणीव आपणास असायला हवी. गरज नसेल, तर या सुविधा नाकारण्याचा मोठेपणाही हवा. जेणेकरून ज्यांना खरोखरच या सवलतींची गरज आहे त्यांच्यापर्यंत या सवलती पोहोचतील. पण त्या मुलांना माझ्या या विचारांमध्ये मुळीच रस नसायचा. कदाचित माझ्या बोलण्याने त्यांना अपराधीपणाची जाणीव होत असावी किंवा मग त्या गोष्टींना महत्त्व न देण्याचा कोडगेपणाच त्यांच्यात भिनला असावा. असे लोक फार कृतघ्न असतात, असं मला मनापासून वाटतं.

मी कॉलेजमधे एस.टी. कॅटेगिरीच्या मुलांना ‘आपल्याला डॉक्टर झाल्यानंतर समाजासाठी काही चांगलं करता येईल का ? ‘यावर चर्चा करण्यासाठी एकत्र करण्याचा प्रयत्न करायचो. पण त्यात त्यांना रस नसायचा. खऱ्या आदिवासींच्या दुःखाची व दारिद्र्याची जाणीवच नसल्याने त्यांना स्वत:पलीकडे बघण्याची सवयच नव्हती. पण घरातील सर्व लोक सुशिक्षित असल्याने कॅटेगिरी अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सवलतींची मात्र त्यांना पुरेपूर माहिती असायची व त्यांना गरज नसतानाही सवलतींचा पूर्ण फायदा घेण्यात काहीही गैर वाटत नसे. याउलट गावाकडील गरीब आदिवासींना मात्र या सोयी – सवलतींचा गंधही नसतो.

एकदा मी गावाकडे असताना माझे मामेभाऊ व चुलतभाऊ आमच्या घरी आले होते. त्यावेळी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी जमविण्यासाठी आमच्या गल्लीत फिरत होते. आमच्या घरी या सर्व मंडळींना पाहून काही शिक्षक तिथे थांबले व माझ्या मामेभाऊ व चुलतभाऊ यांना शिक्षणाचे फायदे समजावून सांगू लागले. ते म्हणत होते, “तुम्ही “एस.टी.’त येता. त्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी खूप सवलती मिळतात. तुम्ही आपल्या मुलांना शाळेत शिकवायला पाठवलं पाहिजे. ‘त्यावर माझा मामेभाऊ त्या शिक्षकांना म्हणाला, “पण मास्तर आम्ही तर रिक्षातून आलो एस.टी.’तून नाही. ‘त्याच्या या बोलण्यावर मात्र मला व त्या शिक्षकांना हसू आवरलं नाही. समाजातील ही एक भीषण विषमता होती. काही लोक स्वतःला आदिवासी समजत नाही पण एस. टी. जमातीत मिळणाऱ्या सर्व सवलतींचा पुरेपूर फायदा घेतात आणि जे लोक खरोखर मागासलेले आदिवासी आहेत, ज्यांना खरोखर या सवलतींची गरज आहे त्यांना ‘एस.टी.’ जमात काय आहे ते सुद्धा माहीत नाही. त्यामुळे शासकीय सवलतींचा त्यांना लाभ मिळत नाही.

मला या सर्व गोष्टी जेव्हा कळायला लागल्या तेव्हा मी माझ्या नातेवाइकांना व भिलाटीतील इतरांना समजावून सांगत त्यांच्या मुलांना शाळेत पाठविण्याबाबत बोलत असे. पण ते नेहमीच मला लहान समजून माझ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. आणि मी जास्त वेळ बाहेरगावीच असल्याने मलाही आमच्या भिलाटीकडे विशेष लक्ष देता येत नसे. त्यामुळे आमच्या भिलाटीत चार – पाच घरे वगळता घरांतील मुलं अशिक्षितच राहिली. दोन वेळच्या जेवणाची सोय करणं, हेच त्या सर्वांच्या जीवनाचं अंतिम ध्येय असायचं आणि अजूनही आहे. मी जेव्हा – जेव्हा एकाच समाजातील या दोन प्रकारच्या वर्गाकडे पाहतो तेव्हा त्यांच्यामधील तफावत पाहून खूप वाईट वाटतं. एकाला आपल्या अधिकारांचीच जाणीव नाही, तर दुसऱ्याच्या जाणिवाच मरून गेलेल्या आहेत. ज्या गरीब, दरिद्री आदिवासींना खरोखर मदतीची गरज आहे त्यांचे प्रतिनिधीत्व करणारा कोणीच नाही. केवळ निवडणुका जवळ आल्या, की चार दिवस त्यांच्या खिशात काही पैसे खुळखुळायचे. इतर दिवशी मात्र त्यांच्या झोपडीत व जीवनातही अंधारच असायचा. मला तळमळीने माझ्या आदिवासी बांधवांना सांगावसं वाटतं की, कुणीही नेता किंवा कोणी समाजसेवक येऊन तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-43

तुमचं आयुष्य केवळ शिक्षणामुळेच बदलू शकतं. नाही तर मागच्या पिढ्यांच्या अंधाराचा वारसा पुढच्या पिढ्याही तशाच चालवत राहतील व तुमचं दारिद्य कधीच संपणार नाही. डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध यासाठीच म्हटलं असावं, कारण ते तुम्हाला केवळ नोकरी व इतर फायदेच देत नाही, तर खऱ्या अर्थाने जगण्याचं बळ देतं. त्या दिवशी त्या बाईंसोबत झालेल्या वादानंतर मी पुन्हा नवा फॉर्म भरला व प्रवेश घेण्याच्या सर्व औपचारिकता पूर्ण करून गावाकडे परतलो. पण मला आता कळून चुकलं होतं, की लवकरच आयुष्यातल्या एका फार मोठ्या बदलाला मला सामोरं जायचंय. आणि मी सुद्धा आता त्यासाठी माझ्या मनाची तयारी केली. छोट्याशा सामोडे गावातील भिलाटीमधील भिल्ल समाजात लहानाचा मोठा झालेला ‘राज्या’ आता मुंबई नावाच्या मायानगरीत ‘डॉ. राजेंद्र भारूड व्हायला सज्ज झाला होता.”

क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading