‘एमबीबीएस’ @ जी. एस. मेडिकल कॉलेज
ऑगस्ट २००६ च्या पहिल्या तारखेपासून माझं कॉलेज सुरू होणार होतं. यावेळी मी मुंबईला एकटंच जायचं ठरवलं. जळगावला माझ्यासोबत क्लासला असलेल्या आणखी चार विद्यार्थ्यांनी शेठ गो. सु. वैद्यकीय महाविद्यालयातच प्रवेश घेतला होता. त्यामुळे मुंबईत आपण एकटे नसू, याचं मला फार समाधान वाटत होतं. ते सर्व माझे मित्रच असल्याने मला त्यांचा मोठा आधार राहणार होता. मी अमोल पवार व अमित तडवी यांना फोन करून आपण एकत्रच जाऊया, असं कळविले, त्यांनीही होकार दिला. डोळ्यात एक सुंदर स्वप्न घेऊन आम्ही जुलैच्या ३० तारखेला मुंबईसाठी निघालो. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मी अगदी उतावीळ झालो होतो.

मुंबईला आल्यावर आम्हाला आमचं होस्टेल दाखविण्यात आलं. ते कॉलेजपासून जवळपास दीड – दोन किलोमीटरवर असलेल्या लालबागमध्ये होतं.’ एमबीबीएस’च्या फर्स्ट इअरच्या सर्व विद्यार्थ्यांच्या निवासाची तिथे सोय होती. कॉलेज कॅम्पसमध्येही होस्टेल होतं, पण ते फक्त थर्ड व फायनल इअरच्या सिनिअर विद्यार्थ्यांसाठीच. शिवाय इंटर्नशिप करत असलेले विद्यार्थीही तिथेच राहत असत. आमचं होस्टेल, खरं तर होस्टेल नसून नगरपालिकेची एक शाळा होती. त्या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यात शाळा भरायची, तर तिसऱ्या मजल्यात आम्ही राहत असू. त्या मजल्यावरच्या प्रत्येक खोलीत सहा सहा मुलं राहत असत.
मी जिथे होतो तिथे माझ्यासोबतच अमित व अमोलही कॉलेजचा पहिला दिवस. त्या दिवशी सकाळी आठ वाजता अनॉटॉमी लेक्चर थिएटरमध्ये उद्घाटन समारंभ होणार असल्याचं आम्हाला कळविण्यात आलं. त्या अॅनॉटॉमी क्लासरूमला थिएटर का म्हणत असावं, हे मला तिथे गेल्यानंतरच कळू शकलं. ती क्लासरूम नव्हतीच मुळी. तो एक भव्य हॉल होता. साध्या वर्गापेक्षा कितीतरी मोठा. त्या ठिकाणी सिनेमा थिएटरमध्ये असतात तशा चढत्या क्रमाने पायऱ्या केलेल्या होत्या व प्रत्येक पायरीवर विद्यार्थ्यांसाठी बेंच ठेवलेले होते. समोर जिथे शिक्षक असतात तिथे मोठे कॉम्प्युटर स्क्रीन व प्रोजेक्टरची व्यवस्था केलेली होती. आम्ही बरोबर आठ वाजता अॅनॉटॉमी थिएटरमध्ये आलो, तेव्हा बरीच मुलं आधीच येऊन बसलेली होती. त्यामुळे आम्हाला मागील रिकाम्या बेंचवर बसावं लागलं. आमच्या बॅचमधे एकूण १८० विद्यार्थी होते. आम्ही तिघंही एका कोपऱ्यात बसलो होतो व एकमेकांशी अतिशय हळू आवाजात बोलत होतो. त्या अनोळखी वातावरणाचं एक अनामिक दडपण आम्हा तिघांच्याही मनावर होतं. मात्र आमच्या समोरील बेंचवर बसलेली मुलं व मुली मोठ्याने हसत तसेच एकमेकांशी इंग्रजीत बोलत होते. त्यांचे चेहरे आत्मविश्वासाने भरलेले होते. त्यांनी अतिशय आधुनिक व फॅशनेबल कपडे घातलेले होते. एक पंजाबी ड्रेस सुद्धा तिथे आढळत नव्हता. सर्वांनी जीन्स, टॉप, टी – शर्ट परिधान केले होते. त्या सर्वांच्या अगदी विपरीत आमची अवस्था होती. मुलं आणि मुली एकमेकांशी हास्यविनोद करत इतक्या सहजतेनं बोलतात, याचं आम्हाला खूपच नवल वाटत होतं. तोपर्यंत माझ्या संपूर्ण आयुष्यात मी मुलींशी एक किंवा दोनदा बोललो असेल, ते सुद्धा कामानिमित्त दोनच शब्द. त्या वातावरणाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आम्ही शांतपणे बसून राहिलो.
काही वेळाने कॉलेजचे प्रोफेसर, पहिल्या वर्षाचे तिन्ही विभागप्रमुख व कॉलेजच्या डीन डॉ. नीलिमा क्षीरसागर तिथे आले. डीन मॅडमनी इंग्रजीतूनच भाषण करत आमच्या नवीन बॅचला शुभेच्छा दिल्या. नंतर सर्व विभागप्रमुखांनी स्वत:ची व आपापल्या विभागातील प्राध्यापकांची ओळख करून दिली. तिथे एका विषयाला २० ते ३० याप्रमाणे सर्व विभागांचे मिळून एकूण ८० ते ९० प्राध्यापक होते. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र स्टाफ व स्वतंत्र लेक्चर हॉल होते. हे सर्व बघून व ऐकून मी तर अवाकच झालो होतो. हे जग त्याक्षणापुरते तरी माझ्या आकलनाच्या कितीतरी पुढचे होते. त्या वातावरणाला समजून घेत मलाही आता माझा वेग वाढवावा लागणार होता. नाहीतर त्या सुसाट दुनियेत माझा निभाव लागणार नव्हता, याची जाणीव मला होत होती. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-44
प्राध्यापकांची ओळख झाल्यानंतर आमच्या बॅचच्या मुलांना स्वत:ची ओळख करून देत डॉक्टर व्यवसाय का निवडला? हे सांगायला पुढे बोलावलं. समोरच्या बाकांवरील पाच – सहा मुलं लगेच उठून फाडफाड इंग्रजीत बोलू लागली. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा जराही लवलेश नव्हता किंवा त्या…
क्रमशः
स्रोत:(IAS डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मी एक स्वप्न पाहिलं.! या पुस्तकातुन)
