“चळवळ” म्हणजे एक आध्यात्मिक विश्व आहे, जेथे तुम्हाला खऱ्या आनंदाची प्रचिती येते. तुमच्या संवेदना जागृत होऊन तुम्हाला खरं समाधान प्राप्त होतं. इथे फक्त चांगल्या आचरणाचंच नाही, तर चांगल्या आहाराचंही ज्ञान मिळतं. जीवनासाठी अन्न ‘या संकल्पनेचं ज्ञान आपल्याला इथे आल्यानंतरच होतं. ‘हरे कृष्ण चळवळीशी जुळल्यापासून मी स्वत:मध्ये खूप सकारात्मक बदल झालेले पाहिले आहेत. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-51
मी नेहमीप्रमाणे कृष्ण भगवंताचं दर्शन घेतलं आणि गुरुजींना भेटलो. त्यांना माझ्या मनातील द्विधा परिस्थिती सांगितली. मनात सुरू असलेला गोंधळ प्रामाणिकपणे त्यांच्यापुढे मांडला. निर्मळपणे हसत गुरुजी मला शांतपणे म्हणाले “Life is all about choices you make in the life”. “आयुष्य तसं बनत जातं, जसे आपण निर्णय घेतो. सोपा मार्ग तर सगळेच स्वीकारतात; पण जो मनुष्य इतरांपेक्षा वेगळा विचार आणि आव्हानात्मक गोष्टींची निवड करतो, तोच सर्वसाधारण लोकांच्या जमावात उठून दिसतो. त्यामुळे स्वत:चा अभ्यास आणि बुद्धिमत्तेवर विश्वास ठेव. जर तुझी ‘यूपीएससी’ करायची मनापासून इच्छा असेल, तर जरूर कर. यश नक्की मिळेल “. त्यांच्या या शब्दांनी मला प्रचंड स्फूर्ती मिळाली. एक नवा विश्वास मिळाला.
आणखी काही वेळ गुरुजींशी चर्चा केल्यानंतर मी निःशंक मनाने होस्टेलकडे परत निघालो. क्षितिजापर्यंत विस्तीर्ण पसरलेला समुद्र आता शांत भासत होता. मला एक वर्षाने सीनिअर असलेले चंद्रशेखर ‘यूपीएससी’ करत असल्याचं ऐकून होतो. मी त्यांची त्वरीत भेट घेतली. त्यांनी मला परिक्षेची संक्षिप्त माहिती दिली आणि फॉर्म कधी भरणार?’ असं विचारलं. माझा गोंधळलेला चेहरा पाहून ते म्हणाले“ यावर्षीच फॉर्म भर, मेमध्ये परीक्षा आहे. माझ्याकडे अतिरिक्त फार्मदेखील आहे”. योगायोगाने मला फॉर्म मिळाला, आणि तोसुद्धा मोफत.
परीक्षा अवघ्या दोनच महिन्यांवर होती. मी विचार केला, परीक्षा तर द्यायचीच आहे, तर मग अभ्यास केलेला काय वाईट! निदान अनुभव तरी मिळेल. आठ – दहा तास इंटर्नशिप आणि उरलेल्या वेळेत अभ्यास, अशी माझी कसरत सुरू झाली. मी चहा – कॉफी वगैरे काहीच घेत नाही. त्यामुळे कामावरून आलो, की थोडासाही वेळ न गमवता लगेच अभ्यासाला बसत असे. चंद्रशेखर यांच्या सल्ल्यानुसार ‘द हिंदू हा पेपर वाचायला सुरवात केली. त्यांनी दिलेली चार – पाच मासिकेही वाचून काढली. युपीएससीमध्ये अयशस्वी ठरलेल्या किंवा मध्येच तयारी सोडून दिलेल्या ४-५ मुलांकडून मी पुस्तकेही मिळवली. चंद्रशेखरकडून आणखी काही पुस्तके मिळाली. अन्य पुस्तकांच्या झेरॉक्सप्रती मिळविल्या. माझे काही मित्र स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेले होते, त्यांनीदेखील काही झेरॉक्स पाठवल्या.

दरम्यान योगेश तोरकडी नावाच्या माझ्या मित्राने घरच्यांच्या इच्छेखातर मेडिकलचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे स्पर्धा परिक्षेची त्याची सर्व पुस्तके मला मिळाली. अशाप्रकारे गोपाळकाल्यासारखी थोडं याच्याकडून, थोडं त्याच्याकडून अशी अभ्यास साहित्याची जमवाजमव झाली आणि माझा अभ्यास नियमित सुरू झाला. आपण जेव्हा मोठं ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यासाठी धडपड करू लागतो तेव्हा बऱ्याचदा आपले प्रयत्न हसण्यावर घेतले जातात. पण ‘असल्या’ हसण्यापेक्षा आपले प्रयत्न नेहमीच खूप मोठे ठरतात, म्हणून तिकडे दुर्लक्षच केलं पाहिजे. मी लायब्ररीमध्ये जेव्हा एका कोपऱ्यात एकटाच बसून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्राची पुस्तके वाचू लागलो, तेव्हा काहीजण मला बघून हसत असत. ‘मेडिकलची मोठी पुस्तकं सोडून, तू ९ वी -१० वी ची लहान – लहान…..
क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.!डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)
