पुस्तकं कां वाचतोस? ‘असं विचारून माझी खिल्ली उडवत. जळगावच्या काही मित्रांनी तर मला ‘यूपीएससीचं काही खरं नसतं. प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पैसा लागतो. जबरदस्त वशिला लागतो ‘असं समजवायला सुरवात केली. काही जण तर मला थेट ‘कलेक्टरसाहेब’, ‘आयपीएस साहेब’ म्हणून चिडवायला देखील लागले. मी मात्र त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आणखी जोमाने अभ्यास केला. याच काळात रावसाहेब, योगेश, अमोल, शिवशंकर, आशीष, आनंद या मित्रांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवत मला खूप प्रोत्साहन दिलं. मी मनात निश्चय केला, की यावर्षी किमान पूर्व परीक्षा तरी पास व्हायचंच.

‘केईएम’ हे महाराष्ट्रातील फार मोठं हॉस्पिटल असल्याने कामाचा व्याप प्रचंड असायचा. त्यामुळे अभ्यासाला फारच कमी वेळ मिळत असे. मात्र याच वेळी मला भाग्याने साथ दिली आणि युपीएससीचा अभ्यासक्रम बदलला. यापूर्वी परिक्षेसाठी एक वैकल्पिक (Optional) व एक सामान्य अध्ययन (General Studies) असे दोन विषय असत. त्यामुळे दोन्ही विषयांत प्रावीण्य मिळवावं लागे. नवीन पॅटर्नमध्ये मात्र General Studies आणि C – SAT असे दोन विषय आलेत. त्यात नव्यानं आलेल्या C – SAT मध्ये गणित, तर्कशास्त्र, बुद्धिमत्ता इत्यादी उपविषयांचा समावेश होता. माझं आठवी ते बारावीपर्यंतचं गणित उत्तम होतं. त्यातल्या त्यात मी नवोदयचा विद्यार्थी असल्याने बुद्धिमत्ता वगैरे विषयांचंही जुजबी ज्ञान होतंच. त्यामुळे दोन महिने मी C – SAT चा अभ्यासच केला नाही. कारण’ एम्प्लॉयमेंट न्यूज’ नावाच्या साप्ताहिकात संपूर्ण अभ्यासक्रम मी बारकाईने पाहिला होता. त्यामुळे मी केवळ सामान्य अध्ययनावर लक्ष केंद्रित केलं.
पूर्व परिक्षेचे दिवस जवळ येऊ लागले. २१ मे रोजी परीक्षा होती. सर्व मित्रांनी मला शुभेच्छा दिल्या. ही सर्व मंडळी जेवणाच्या वेळी वगैरे सतत मला प्रोत्साहन देत होती. सीएसटीच्या जवळ परीक्षा केंद्र होते. वातावरण अतिशय तंग होतं. सामान्य अध्ययनचा पेपर मनासारखा गेला नाही. निगेटिव्ह गुणदान पद्धत असल्याने उत्तरे चुकली तर गुण वजा होण्याचा संभव होता. त्यामुळे धोका न पत्करता मी १०० पैकी केवळ 50 प्रश्नांची उत्तरे लिहिली. दुसरा C – SAT चा पेपर मात्र अभ्यासाशिवायच पूर्ण सोडविला. शाळेत शिकत असतांना घोकंपट्टीऐवजी मी आवडीने केलेल्या अभ्यासाचा मला नेमका फायदा झाला. युपीएससी पूर्वपरीक्षा पास होईनच, याची मला खात्री वाटत होती.
पूर्व परिक्षेनंतर मात्र केईएमच्या व्यापामुळे अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष असं होत गेलं. मी पूर्णतः इंटर्नशिपच्या कामांत गढून गेलो. निकालासाठी सुमारे दोन महिन्यांचा अवधी होता. माझ्या शिक्षणासाठी प्रचंड कष्ट उपसतांना मी आईला लहानपणापासून बघत आलो होतो. तिच्या आयुष्यातील या खडतर प्रकरणाचा लवकरात लवकर शेवट होऊन नव्या आनंददायी अध्यायाची सुरवात व्हावी, असं मला मनापासून वाटत होतं. त्यामुळं शासकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला तर, कुटुंबियांचा त्रास नक्कीच कमी होईल, या विचारानं पुन्हा डोकं वर काढलं.
आणि मी परत पदव्युत्तर प्रवेश परिक्षेच्या तयारीला लागलो. पण त्यामध्ये माझं मन रमत नाही, हे माझ्या लवकरच लक्षात आलं. त्याच दरम्यान मला नीलेश पाटील नावाच्या मित्राचा फोन आला. मुंबईत दंतवैद्यक अभ्यासक्रम पूर्ण करून तो भारतीय आर्मीमध्ये मेडिकल कॅप्टन म्हणून कमान सांभाळत होता. नीलेश मला नेहमीच खूप प्रोत्साहीत करीत असे. फोनवर त्याने मला ‘युपीएससीच्या मुख्य परिक्षेच्या तयारी करायला लाग’, सांगितलं आणि ‘पदव्युत्तर प्रवेशाचा अभ्यास कायमचा बंद कर म्हणून बजावलं. मुख्य परिक्षेला एकूण ९ पेपर असतात. त्यात दोन ऐच्छिक विषयांचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. तसाही पूर्व परिक्षेच्या निमित्ताने फक्त दोनच महिन्यांचा मी अभ्यास केला होता. आणि आता मुख्य परिक्षेला केवळ तीनच महिन्यांचा कालावधी उरला होता. माझ्यापुढे यक्षप्रश्न होता,’ भारतातील सर्वांत कठीण परिक्षेचा डोंगर फक्त तीन महिन्यांच्या अभ्यासाने कसा सर करायचा?’. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-52
दरम्यान मी सप्टेंबर महिन्यात एकदा सामोड्याला आलो होतो. आयुष्यात विचित्र व मन हादरवून टाकणाऱ्या अनेक घटना मी बघितल्या होत्या. पण पिंपळनेरच्या जत्रेच्या वेळी झालेली ती भयंकर घटना मात्र मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यावेळी पिंपळनेरला खंडोजी महाराजांची ‘नामसत्ता’ नावाची एक खूप मोठी जत्रा भरली होती. दूरवरून लोक त्या जत्रेला येत असत. मी तिसरीत असताना एकदा त्या जत्रेला गेल्याचं मला आठवतं. त्यानंतर मात्र माझ्या शिक्षणाच्या धावपळीत कधी तिथे जायचा योग आला नाही. विविध देवदेवतांची व राक्षसांची सोंगे’ हे त्या जत्रेचं खास वैशिष्ट्य होतं. ते बघायला लोक यात्रेत खूप गर्दी करायचे. यावेळी मला थोडा मोकळा वेळ असल्यानं मी यात्रेला जायचं ठरविलं. भिलाटीतील माझे काही मित्रही माझ्यासोबत येणार होते. आई मात्र वारंवार मला तिथे जाऊ नको म्हणून सांगत होती. पण माझी यावेळी जत्रा बघायची खूपच इच्छा होती. त्यामुळे मी आईकडे हट्टच धरला. माझ्या मित्रांनीही
क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.!डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)
