मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ. राजेंद्र भारुड (IAS), भाग ५६.

जाता आलं नाही. आई आणि चंदुनाना होस्टेलजवळ पोहचले. काका आणि मावशी कॅन्टीनबाहेर माझी वाट बघत असल्याचा निरोप मिळाला. मी चौघांना आणायला गेलो. आमच्या कॉलेजचा भव्यदिव्य कॅम्पस पाहून आईच्या तोंडून शब्दच फूटत नव्हते. उच्चभ्रू पालकांनी भरलेल्या कार्यक्रमाच्या सभागृहात मी आईला बसवलं. संपूर्ण हॉलमध्ये फक्त माझी आईच नऊवारी पातळ नेसून, डोक्यावर पदर घेवून मावशीशेजारी बसली होती. अन्य पालकांमध्ये साड्यासुद्धा तुरळकच दिसत होत्या. पालक आपल्या मुलांशी इंग्रजीतून संभाषण करत होते. माझ्या आईला तर मराठीसुद्धा बोलता येत नसे. आई मावशीजवळ नुसती बसून होती. आम्ही आयोजक असल्याने स्टेजजवळ उभे होतो. आपापल्या पालकांना खुर्चीवर बसवून सर्व विद्यार्थी हॉलच्या भिंतीला लागून मागे उभे होते.

कार्यक्रम सुरू झाला. डीन सरांचं भाषण झालं. मराठीही न बोलता येणाऱ्या माझ्या आईला ते इंग्रजीतलं भाषण कळण्याची शक्यताच नव्हती. माझं अर्ध चित्त आई आणि मावशीकडेच होतं. मावशी आईला सर्व कार्यक्रम समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे माझ्या मनावरचा ताणही हळूहळू हलका होत गेला. कार्यक्रमानंतर आमचा शपथविधी झाला. फोटोसेशन झालं. डोळे दीपवणारा असा कार्यक्रम आईने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. त्यामुळे ती भारावून गेली होती. सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विना कांदा – लसणाचं जेवण आवडलं होतं.

त्याच संध्याकाळी माझे सर्व मित्रमंडळ एका रिसॉर्टमध्ये पार्टीसाठी गेले. पण मी आई व मावशीला इस्कॉनच्या मंदिरात गुरुजींना भेटायला घेऊन गेलो. मावशींनी गुरु जवळ माझी खूप प्रशंसा केली, तेव्हा गुरुजी उद्गारले, “हे तर काहीच नाही. ही केवळ सुरवात आहे. त्याचे यापेक्षा खूप मोठे सत्कार होणार आहेत. हा पुढे नक्कीच एक नामांकित व्यक्ती होईल. “आई सर्व संभाषण शांतपणे ऐकत होती. मावशींनी तिला अहिराणीतून सगळं समजावून सांगितलं. गुरुजींनी आईला आणि मावशींना भगवद्गीतेची एक – एक प्रत व तुळशीमाळ भेट म्हणून दिली. आई माझ्या पदवीदान समारंभाला उपस्थित होती, याचा मला मनोमन आनंद वाटत होता. तिच्या नुसत्या उपस्थितीने माझा संपूर्ण दिवस अविस्मरणीय झाला होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सामोड्याच्या शाळेत पहिल्या दिवशी आई व मोठमायने मला उचलून नेऊन जवळजवळ आदळलंच होतं. माझ्या रडण्याकडे दुर्लक्ष करून एका नव्या जगाची कवाडं माझ्यासाठी उघडली होती. त्या दिवशी आईला काहीच कल्पना नसेल की, सामोड्याच्या त्या छोट्याशा शाळेतून सुरू होणारा माझा प्रवास इथपर्यंत येणार आहे. पण मी इतक्यात समाधानी नव्हतो. मला आणखी बराच पल्ला गाठायचा होता.

आता मुलाखतीच्या टप्प्याची मला तयारी करायची होती. ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमवायची नव्हती. कारण मी मेडिकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठीची प्रवेश परीक्षा दिली नव्हती. त्यामुळे माझ्यासमोर दोनच पर्याय होते; एकतर प्राथमिक आरोग्य केंद्रावर मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणं किंवा मग युपीएससीद्वारे पद मिळवणं. मी दुसरा पर्याय निवडला होता. मुलाखतीपूर्वीचा एक महिना मला चांगलाच अभ्यास करावा लागणार होता. एव्हाना इंटर्नशिप संपली होती. मी पदवी मिळवण्यासाठीचे सर्व कागदपत्र गोळा केले. कारण पदवी प्रमाणपत्राशिवाय मी मुलाखतीसाठी पात्र ठरलो नसतो.. एक महिनाभर जोरदार अभ्यास केला. माझे सिनिअर मित्र चंद्रशेखरसुध्दा यावर्षी मुख्य परीक्षा पास झाले होते. त्यामुळे आम्ही दोघंही पुण्याला गेलो. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-56

तिथल्या यशदा ‘नावाच्या शासकीय अॅकॅडमीत मुलाखत कशी असते ? त्यासाठी सराव कसा करायचा ? यविषयी जाणून घेतलं. सरावासाठी तिथे दोन मुलाखतीही दिल्या. यशदामध्ये मोफत प्रशिक्षण असल्यामुळे मला कोणतीही अडचण आली नाही.

क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading