चेअरमन सर: जर तुमची धुळे जिल्ह्यात पोस्टिंग झाली, तर तुम्ही काय करणार? मी: सर, मी त्याला एक आव्हान म्हणून स्वीकारेन व जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन. मी माझ्या जिल्ह्याला अशा स्तरावर न्यायचा प्रयत्न करेल की, भविष्यात कोणताही अधिकारी तिथे येण्यास कचरणार नाही. (यावर चेअरमन सरांनी समाधानकारकपणे प्रतिक्रिया देत मान हलवली व इतर सदस्यांना मला प्रश्न विचारायला सांगितले.
त्यातले पहिले सदस्य माझ्या फार जवळ होते. त्यांनी अतिशय हळू आवाजात प्रश्न विचारायला सुरुवात केली. मला त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐकू येत नव्हते, पण त्यांच्या काही शब्दांवरून प्रश्नाचा अंदाज घेत मी उत्तर देऊ लागलो.) सदस्य: ….. क्रांती होत आहे.. ….. लांब प्रक्रिया पण अचानक एखादया फवाऱ्यासारखी उसळली…… (मला वाटलं की, ते अरब राष्ट्रातल्या क्रांतीविषयी बोलत आहेत.) मी: सर, अरब देशांतील क्रांती अचानक उसळल्यासारखी वाटत असली, तरी त्यामागे वर्षानुवर्षे चालत असलेली सरंजामशाही, पिळवणूक, बेरोजगारी व दडपशाही कारणीभूत आहे. आता लोकांच्या मनात सुप्त असलेला राग आता उसळून बाहेर आल्याने ती क्रांती अचानक घडल्यासारखी वाटत आहे. पण माझ्या मते त्यालाही एक प्रदीर्घ पार्श्वभूमी आहे.
सदस्य: तुम्हाला … वाटते …… ही लाट ……. भारतात ….. मी: नाही सर, भारत एक लोकशाहीप्रधान देश असल्याने व इथे लोकांची सत्ता असल्याने अरब देशांसारखी स्थिती भारतात येणे अशक्य आहे. (त्यांनी अरब देशांविषयी आणखी काही प्रश्न विचारले.
नंतर त्यांनी महिला सदस्यांना मला प्रश्न विचारण्याची सूचना केली. त्या सुरुवातीपासूनच माझे बारीक निरीक्षण करत होत्या. सुरुवातीला त्यांनी मला के.ई.एम. हॉस्पिटल व अरूणा शानबाग आणि माझ्या मुंबईतील वास्तव्याविषयी प्रश्न विचारले.

त्यानंतर दुसऱ्या सदस्याने प्रश्न विचारायला सुरवात केली. सदस्य २: बाहेरून मुंबईला येणारे लोक ही समस्या आहे, असं तुम्हाला वाटतं का?: मी: एक भारतीय नागरीक या नात्याने ही समस्या आहे, असं मला वाटत नाही. आपल्या घटनेने सर्वांना कुठेही राहण्याचा व व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण मुंबई समुद्राने वेढलेलं शहर असल्याने तिच्या विस्ताराला मर्यादा आहे. यामुळे मुंबईत भयानक गर्दी वाढून झोपडपट्टीचा अनिबंध विस्तार झाला आहे. याने नागरिकांना मिळणाऱ्या पाणी, वीज इत्यादी सुविधा पुरविताना प्रशासनाला खूप अडथळे येतात. आणि इतर कोणत्याही शहरांपेक्षा बाहेरून मुंबईत येणाऱ्या लोकांची संख्या खूपच जास्त असल्याने तिथल्या स्थानिक लोकांना रोजगाराच्या समस्येला तोंड द्यावं लागतं, हे तेवढंच खरं आहे. (माझ्या उत्तराने त्यांच्या चेहऱ्यावर स्मीत उमटलं.)
सदस्य: बाहेरून आलेल्या लोकांचे मुंबईसाठी काही गदान आहे कां? तुम्हाला काय वाटतं? मी: हो नक्कीच. बाहेरून आलेले बहुतांश लोक टॅक्सी, भेळपुरी, पाणीपुरी इत्यादी व्यवसाय चालवतात. ते जर एकाएकी मुंबई सोडून गेले, तर काही समस्या तर नक्कीच उद्भवतील. (इथे मी मुंबईचे स्थानिक शब्द व भाषा वापरल्याने सर्व सदस्य हसू लागले. त्यांनी पुढे मला म्हाडा व धारावी विषयी काही प्रश्न विचारले व मी त्यांचीही उत्तरे दिली.
नंतर त्यांनी तिसऱ्या सदस्यांना प्रश्न विचारायला सांगितलं) तुमचं वैद्यकीय ज्ञान तुमच्या प्रशासकीय भूमिकेत तुम्हाला कशी मदत करेल, असं तुम्हाला वाटतं? मी: सर, वैद्यकीय कामात आम्हाला पेशंटच्या शारीरिकच नाही, तर सामाजिक, आर्थिक परिस्थितीविषयी सुद्धा खूप जवळून माहिती मिळते. ते कुठे राहतात? तिथे स्वच्छता विषयक समस्या काय? हे आम्हाला कळतं. त्यांना कुठल्या प्रकारचे अन्न खावं लागतं? याचंही आम्हाला ज्ञान होतं. त्यामुळे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी तर मदत होतेच, पण ते आजार होऊच नयेत, यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे हेही कळतं.
तुम्ही आदिवासी विभागातून आहात. त्या विभागात बाहेरून हस्तक्षेप न करण्याच्या व आदिवासी संस्कृती जपण्याच्या संदर्भाने स्वत:च्या बळावर विकास करण्याबाबत सध्या ज्या मागण्या येत आहेत, त्यावर सदस्य ३: सदस्य ३: तुमचं काय म्हणणं आहे? मी: सर, वरकरणी पाहता ते योग्य वाटतं. पण दूरचा विचार केल्यास आजच्या जागतिकीकरणाच्या काळात देशाच्या प्रत्येक भागाचा समान विकास होणं फार गरजेचं आहे. नाही तर, समाजातील काही घटक अत्यंत प्रगत व काही घटक अत्यंत अप्रगत राहून सामाजिक दरी वाढेल व त्यामुळे देशाच्या समस्याही वाढतील. म्हणूनच आदिवासी समाजाचं सांस्कृतिक वैशिष्ट्य जपत त्यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल, यावर विचार होणं फार गरजेचं आहे.
(त्यानंतर त्यांनी नक्षलवाद, टाटा ट्रक डील, इत्यादी विषयांवर प्रश्न विचारले व चेअरमन साहेबांना इशारा केला.) चेअरमन सर: विदर्भात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्यामागे काय कारण आहे, असं तुम्हाला वाटतं? मी: सर, जर मीडियाने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या मानल्या, तर सावकारी कर्जाच्या ओझ्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं वाटतं. (यावर मला मध्येच थांबवत चेअरमन म्हणाले ) चेअरमन सर: मीडियाचं म्हणणं खरंच आहे. सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली दबूनच शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. मी: पण सर, सावकार पूर्वीपासूनच तिथे आहेत. आणि शेतकरी कर्जही पूर्वीपासूनच घेत आहेत.
मग आत्महत्या आत्ताच का होत आहेत? मला असं वाटतं की शेतकरी बीटी कापूस व इतर व्यावसायिक पीक पीकविण्यासाठी खत, बियाणे, किटकनाशके यांचा वापर वाढवत आहेत. त्यामुळे ही सर्व उत्पादने कमालीची महाग झाली आहेत. शिवाय मान्सूनही वेळी अवेळी त्रास देतच असतो. आणि यातच सरकारकडूनही उत्पादनाची कमाल किंमत ठरविली जाते. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने कोंडीत सापडतो. यातूनच निराश होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, असं मला वाटतं. (माझ्या या उत्तरावर चेअरमन सर खूप खूश झाले.) i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-59
सदस्य तुम्ही तुमच्या बायोडेटामध्ये वादविवाद हा तुमचा छंद असल्याचं लिहिलं आहे. मी (त्यांचं बोलणे पूर्ण होऊ न देता) : होय सर. पण मला वादविवाद हे विविध स्पर्धातूनच करायला आवडतं, रोजच्या जगण्यात नाही…
क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)
