सदस्य(हसत): ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही कोणकोणती नाटकं पाहिलेली आहेत. मी: सर, मी कॉलेजमधे असताना बऱ्याच नाटकांतून काम केलेलं आहे. पण व्यावसायिक नाटकं मात्र क्वचितच बघितली.
सदस्य: ठीक आहे, पण महाराष्ट्रातल्या काही प्रसिद्ध नाटकांची नावं तर तुम्ही सांगू शकता! मी: सर, मला नीळू फूले यांनी काम केलेलं एक जुनं नाटक ‘सखाराम बाईंडर’ माहीत आहे. ते खूपच प्रसिद्ध आहे.
चेअरमन सर: ‘घाशीराम कोतवाल’ नावाचं आणखी एक नाटक खूप प्रसिद्ध असल्याचं मी वाचलं आहे. (यावर आम्ही दोघेही एकाच वेळी हसलो.) चेअरमन सर: ते नाटक हिंदीतही केलं गेलंय. आणि मी ते पाहिलेलं आहे. (आता मी थोडा थकलो होतो व माझ्या घशालाही कोरड पडली होती.) i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-60
चेअरमन सर: ठीक आहे. तर आता मला सांगा की, एकाच प्रकारच्या जमातीत लग्न न केल्याने कोणत्या प्रकारच्या आजारांना आळा बसतो. मी: सर सिकलसेल, अॅनिमियासारख्या आनुवांशिक आजारांना एकाच जमातीत लग्न न केल्याने आळा बसू शकतो. काही जमातीमध्ये या आजारांचं प्रमाण खूप जास्त असल्याने त्यांना आपल्या जमातीत लग्न न करता इतर जमातीत लग्न करण्यासाठी आजकाल जागरूकता मोहीम राबवली जाते.(यावर चेअरमन सरांनी होकारार्थी मान डोलवली)
खरं तर मुलाखत खूप लांबत होती. आणि मला तहानही खूप लागली होती. तरीही मी हसत हसत व सकारात्मकपणे सर्व प्रश्नांची उत्तरे देत होतो. माझ्या बहुतेक उत्तरांवर सर्व सदस्य होकारार्थी मान हलवत होते. शेवटी चेअरमन सरांनी ‘गूड’ असं म्हणून माझा इंटरव्यू संपल्याचं मला सांगितलं.
सर्वांना परत एकदा अभिवादन करून मी हॉलच्या बाहेर पडलो. शिपायाला वेळ विचारली. त्याने १२:३७ झाल्याचं मला सांगितलं. सर्वसाधारणपणे मुलाखत १५ ते २० मिनीटं चालते. पण माझी मुलाखत तब्बल ४५ मिनीटं सुरू होती. मनावरचं एक दडपण हलकं झाल्यासारखं मला वाटत होतं. मी कृष्ण भगवानचे आभार मानले. बहुतेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली होती.
मुलाखत अतिशय चांगली झाल्याचं मी लगेच मावशीला आणि गुरुजींना फोन करून कळवलं. माझी मुलाखत चांगली गेल्यामुळे त्यांना फार आनंद झाला. समाधानी मनाने मी मुंबईला परतलो.
माझे काही मित्र पदव्युत्तर शिक्षणासाठी दुसरीकडे निघून गेले होते. जे पदव्युत्तर प्रवेश परिक्षेत अपयशी ठरले होते, त्यांनी परत प्रवेश परिक्षेचा अभ्यास सुरू केला होता. त्यानंतर कॉलेजमधील एम.बी.बी.एस.च्या डिग्रीसाठी मिळणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मी सामोड्याला घरी आलो आणि अंतिम निकालाची वाट पाहू लागलो.”
क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)

