दिनांक १० ऑगस्ट, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याऐवजी स्वतःला मिळालेल्या पुरस्कार व ट्रॉफीज लावल्या आहेत. राष्ट्रीय पुरुषांच्या प्रतिमा लावण्याबाबत शासनाचा कोणताही आदेश नसल्याचे ढिकलेंनी सामाजिक कार्यकर्त्यांना मागे सांगितले होते.

यानंतर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी आवाज उठवत भारतीय (१५ ऑगस्ट) स्वतंत्र दिनापूर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा कार्यालयात लावाव्यात अन्यथा.! पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन काल दिनांक ९ ऑगस्ट रोजी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सादर केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस निरिक्षक रामराव ढिकले कर्तव्यावर रुजू झाल्यापासून श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील अवैध धंदे रोखण्यास त्यांची यंत्रणा सक्षम नसल्याचे समोर आले आहे. खुलेआम चाललेल्या गोरख धंद्यांना अभय मिळतांना निदर्शनास येत आहे. साधारण व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कोरोनाच्या नावाखाली दडपशाही वापरली जात आहे. आणि यातूनच पोलीस प्रशासनाकडून वैध/अवैध व्यवसाय व कोरोनाच्या साथी आडून तालुक्यातील सामान्यांसह धनदांडग्यांनाही लुटण्याचे सत्र जोरात चालू आहे. यातील वास्तव परिस्थिती तालुक्यासमोर आहे. या प्रक्रियेत दंग असलेले पोलीस निरीक्षक ढिकले हे मात्र, महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यास विसरलेत की काय.? अशी चर्चा रंगू लागली आहे.

दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील काही सामाजिक/राजकीय कार्यकर्ते एका विषयासंदर्भात पोलीस निरीक्षकांकडे चर्चेसाठी बसले असतांना, महापुरुषांच्या प्रतिमाबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल ठवाळ यांनी उपस्थित केलेल्या विषयास दुय्यम दर्जा देत, राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पोलीस स्टेशनला नसतात, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यानंतर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याविषयी चर्चा झाली. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना महापुरुषांची एलर्जी असल्याने ते जीआर असतांनाही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पोस्टे मध्ये लावत नाहीत. असे निदर्शनास येऊ लागले.
यानंतर अनिल ठवाळ (जि.प सदस्य), मिराताई शिंदे (सामाजिक कार्यकर्ता), नंदुभाऊ ससाने (मातंग युवक संघटना), मुकुंद सोनटक्के (सामाजिक कार्यकर्ता), जिवाजी घोडके (सामाजिक कार्यकर्ता), संदीप उमाप (राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष), शिवराज ताडे, जयंत होळकर व बहुजन समता पत्राचे (संपादक) चंदन घोडके यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करत, १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस ठाण्यात महापुरुषांच्या प्रतिमा लावाव्यात. टाळाटाळ केल्यास, पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा बहुजन समाजाने निवेदनाद्वारे दिला आहे.

त्याचबरोबर एक शिष्टमंडळ राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ढिकले यांच्या कारभारासह वारंवार तोंडी उल्लेख होणाऱ्या त्यांच्या संपत्तीच्या चौकशी संदर्भात निवेदन सादर करणार असल्याचे समजते आहे.
स्त्रोत:(निवेदन)

