माणसात देव पाहणारे- संत गाडगेबाबा..
महाराष्ट्र हि संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते. अनेक संतांनी भक्ती मागनि समाजात जागृती करून लोककल्याणासाठी आपले आयुष्य अर्पण केले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रोहिदास, एकनाथ असे अनेक संतांनी सामाजिक कार्य केले. महाराष्ट्रात असे एक संत होऊन गेले ज्यांनी समाजसेवा हिच ईश्वरसेवा मानून माणसात देव पाहून लोकांची सेवा केली. त्यांनी स्वतः हातात खराटा घेवून गावे स्वच्छ करण्याबरोबरच समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या रुढी परंपरा, अस्वच्छ विचार दूर करत आदर्श समाज घडविण्याचे काम केले त्या थोर संतांचे नाव होते संत गाडगेबाबा.
आज (२३ फेब्रुवारी) संत गाडगेबाबा जयंती. त्या निमित्त त्यांच्या महान कार्यास उजाळा… बालपणापासूनच डेबुजी शेतात गुरे राखत नांगर चालवत. समाजसेवेची आवड होती. स्वतः संसार सोडला पण जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आयुष्यभर त्यांनी लोकांची सेवा केली. तल्लख बुद्धिमत्ता असल्याने त्यांनी अभ्यासपूर्ण किर्तने चालू केली.अंधश्रद्धा विरोधात, चुकीच्या रुढी परंपरावर त्यांनी शाब्दीक प्रहार केले.
स्वताच्या मुलीच्या बारशाला त्यांनी रुढी प्रमाणे मटण दारू ऐवजी गोडधोड जेवण देवून चुकीच्या रूढींवर त्यांनी प्रहार केला. देव हा देवळात नसून माणसात असतो हे सांगून त्यांनी समाजातील दुःखी, आजारी, शोषित पिडीत लोकांची सेवा केली. खरा धर्म सांगताना ते म्हणतात भुकेल्याना अन्न, तहानल्यांना पाणी, कर्ज काढु नका हे समाजात त्यांनी ठणकावून सांगितले.
देवाच्या नावाखाली होणारी प्राणी, पशुहत्या बंद करण्याचे आव्हान त्यांनी समाजाला केले. कीर्तनात ते जनजागृती करत. त्यांनी दवाखाने, पाणपोया, धर्मशाळा, वसतिगृह बांधले. जगाला त्यांनी जगाला स्वछतेचा महामंत्र दिला. त्यांच्या नावे आजही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कार्यरत आहे.
आज अंधश्रद्धा, चुकीच्या रुढी परंपरा, वाढते व्यसन, कर्जापोटी होणार्या आत्महत्या अशा दिशाहीन झालेल्या समाजाला गाडगेबाबांच्या विचारांची गरज आहे. गाडगेबाबांच्या विचारांचे आचरण केल्यास आदर्श समाज घडेल. अशा या महान संतास विनम्र अभिवादन.
लेखक- महेंद्र मिसाळ ९८५०३९२४१४ (व्याख्याते व लेखक)..




