दिनांक १३ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील तहसिलदार डॉ. क्षितीजा वाघमारे/काळे यांच्या विरोधात हप्तेखोरी आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) चे ॲड. ऋषीकेश गायकवाड यांनी तहसिलदार वाघमारे यांच्या कार्यालयातील हप्तेखोरी, लाचखोरी, आणि दप्तर दिरंगाईच्या प्रकरणांची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून, फेसबुक लाईव्हद्वारे आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.
ऋषीकेश गायकवाड यांच्या मते, तहसिलदार वाघमारे यांनी कार्यालयीन कामकाजात भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराची पद्धत विकसित केली आहे. त्यांच्या कार्यकाळात श्रीगोंदा तहसिल कार्यालयात हप्तेखोरी, लाचखोरी, आणि दप्तर दिरंगाईच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हे सर्व प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे.
गायकवाड यांनी असेही म्हटले आहे की, तहसिलदार वाघमारे यांनी महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांमध्ये, पुरवठा विभागाशी संबंधित व्यवहारात आणि अन्य महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आपले पती आणि दलालांचा वापर करून आर्थिक तडजोडी करून घेतल्या आहेत. या सर्व प्रकरणांची आकडेवारी गायकवाड यांनी पुराव्यानिशी गोळा केली असून, ती फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.
गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, वरिष्ठ अधिकारी श्रीगोंदा तहसिल कार्यालयात भेट देणार असतील, त्या दिवशी ते फेसबुक लाईव्हद्वारे तहसिलदार वाघमारे यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची माहिती जाहीर करतील. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, आणि उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा माहिती दिली आहे.
तहसिलदार वाघमारे यांच्याविरुद्ध कारवाई न झाल्यास, गायकवाड यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, त्यांच्या आंदोलनाची मागणी फक्त व्यक्तिगत नसून, श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे हित साधणे हेच आहे.
स्रोत:(निवेदन)





