दिनांक १७ फेब्रुवारी २०२६,श्रीगोंदा:
तालुक्यातील येळपणे येथे एका ८८ वर्षीय वृद्ध माजी सैनिकाच्या हक्काच्या जमिनीवर स्थानिक गुंड आणि भूमाफियांनी अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
“पैसे देऊन तुम्हाला त्रास देण्यासाठी आम्हाला येथे बसवले आहे,” असे म्हणत २५ ते ३० जणांच्या टोळीने शेतात छप्पर टाकून गायकवाड कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने पीडित कुटुंबाने आता जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली असून, न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा किंवा आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
येळपणे येथील रहिवासी श्री. गणपत भिकाजी गायकवाड (वय ८८) यांना भारतीय सैन्यात सेवा बजावल्याबद्दल सरकारने गट नं. ८८/३६ मध्ये जमीन प्रदान केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून गायकवाड कुटुंब या जमिनीची वहिवाट करत आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेजारील काही व्यक्ती आणि गावातील काही हितसंबंधी लोकांनी या जमिनीवर डोळा ठेवून किरण भोसले व इतर २५-३० जणांच्या मदतीने तिथे अनाधिकृतपणे छप्पर टाकून अतिक्रमण केले आहे.
अर्जदार सुरेश गणपत गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही बौद्ध (महार) समाजाचे असून, समोरचे लोक आम्हाला खोट्या ‘अॅट्रॉसिटी’ गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आहेत. विशेष म्हणजे, २५ वर्षांपूर्वी याच पद्धतीने माझ्या मामांचा (जनार्दन मारुती भालेराव) खून करण्यात आला होता, ज्याची धास्ती आजही आमच्या मनात आहे. स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती, तलाठी आणि सरपंच यांना कल्पना देऊनही अद्याप तोडगा निघालेला नाही.”
या प्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला आहे. गावातील काही गुंड आणि दलाल यांच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार सुरू असून, मानसिक छळ करून मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचेही अर्जात नमूद केले आहे.
किरण भोसले हा भूमिहीन नसतानाही त्याला समोर करून जे दलाल आणि गुंड राजकारण करत आहेत, त्यांची सखोल चौकशी व्हावी., वडील आणि कुटुंबाला संरक्षण मिळावे.
जर तातडीने कारवाई झाली नाही, तर श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधिक्षक, तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन या वृद्ध सैनिकाच्या कुटुंबाला न्याय देणार की..? भूमाफियांचे फावणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(निवेदन)

