श्रीगोंदा नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार: ‘भ्रष्टाचार… हाणामारी.. टक्केवारी’ हेच पदाधिकाऱ्यांचे उद्दिष्ट..!: संतोष इथापे..
दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ | श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिकेतील कथित भ्रष्ट कारभाराचा आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोषी इथापे यांनी आज माध्यमांशी बोलताना नगरपालिकेच्या साडेसात वर्षांच्या कार्यकाळातील अनेक गंभीर गैरव्यवहार आणि अनियमितता चव्हाट्यावर आणल्या. त्यांनी स्पष्ट केले की, “भ्रष्टाचार… हाणामारी.. टक्केवारी..! हे नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे उद्दिष्ट नसावे.!”
इथापे यांनी नमुद केले की, तत्कालीन ७.५ वर्षांच्या कार्यकाळात (ज्यात भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखालील अडीच वर्षांचा कार्यकाळ आणि त्यानंतर पक्षांतर करून काँग्रेसमध्ये गेलेल्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ समाविष्ट आहे) झालेल्या गैरकारभाराचा ओहापोह केला. त्यांच्या मते, या काळात नगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांना, योजनांना आणि उपाय योजनांना हरताळ फासण्याचा कार्यक्रम झाला.

चेंबरमधील गाळ काढण्याच्या नावाखाली लक्षावधींचे बोगस बिल काढून ते संगनमताने वाटून हडप केले गेले.
फिल्टर हाऊसचा क्लोरीन आणि तुरटी खरेदी इथपर्यंत भ्रष्टाचार पाझरला.
घनकचऱ्याची टेंडर हेतू पुरस्कर ठरवून पैसे मिळवण्याची टेंडर म्हणून वापरले गेले.
डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जाळून, त्यासाठी प्रक्रिया/विलगीकरणासाठीचा असलेला निधी गडप करण्यात आला.

इथापे यांनी अत्यंत उच्च किमतीच्या कामांमधील गैरव्यवहारांवरही प्रकाश टाकला:
उच्चदाब गॅस वाहिनी पाईपलाईन (श्रीगोंदा ते संभाजीनगर) श्रीगोंदा शहराबाहेरून जात असताना, तिचा मार्ग बदलला. रस्ता दुरुस्तीच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून पालिका फंडात ७.५ कोटी रुपये निधी घेतला गेला. परंतु, यातील निम्मा निधी आधीच गडप करण्यात आला.
मार्ग ठराव करून मंजूर करण्यासाठी कोटी-दोन कोटींचा आर्थिक लाभ मिळवला गेला.
सहा कोटींच्या स्ट्रीट लाईट खरेदीत २५ हजाराचा पोल एक लाखाला खरेदी करून कोटीतच भ्रष्टाचार करण्यात आला.
दहा कोटींच्या सौर दिव्यांच्या खरेदीत एक पोल मागे ७०% टक्के नफा कमावण्यात आला. याव्यतिरिक्त ५ कोटींचे सौर दिवे खरेदी करून पुन्हा मोठा नफाच नफा मिळवला गेला.
जळालेल्या फॉगर मशीनचा सुद्धा गैरव्यवहार झाला.
इथापे यांनी आरोप केला की, नगरपालिकेची सत्ता कोट्यावधी रुपये मिळवण्याचा अड्डा म्हणून वापरली गेली. परत कोट्यावधी रुपये खर्च करून सत्ता मिळवण्याचा हट्ट आणि त्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्यात आला. यामुळे, आंदोलकांनीसुद्धा पैशापुढे लोटांगण घालून पैशावाल्या पक्षांच्या वाटा धरल्या, ज्यामुळे जनतेच्या मनात हतबलतेचा लाटा निर्माण झाल्या.
इथापे यांनी स्पष्ट केले की, या सर्व गैरव्यवहारांत केवळ एका व्यक्तीला जबाबदार धरता येणार नाही. या भ्रष्ट ठरावांना मान्यता देण्यात भाजप पक्षाच्या ११ नगरसेवकांचा तितकाच सहभाग होता. ‘विकास कामांसाठी आम्ही एकत्र आहोत,’ ही फक्त गोंडस भुलवन होती.
या संपूर्ण भ्रष्टाचारावर ठाम भूमिका घेत संघर्ष केला, तो तत्कालीन नगरसेवक गणेश भोस आणि त्यांच्या चार-पाच नगरसेवकांच्या गटाने, असेही इथापे यांनी नमूद केले.
स्रोत:(संतोष इथापे यांची मुलाखत)
