दिनांक १० नोव्हेंबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्यांवर होणारी अवजड वाहतूक या दुरावस्थेला कारणीभूत आहे. श्रीगोंदा ते पेडगाव व श्रीगोंदा ते ढोरजा हा रस्ता खराब झालेला असून, याठिकाणी वाहतूक व प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. याबाबत ढोरजा व पेडगाव ग्रामस्थांनी दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या उप अभियंता अंपळकर यांना निवेदन सादर केले.
पेडगाव ते श्रीगोंदा या रस्तावर होणारी ऊस वाहतूक तसेच चोरट्या मार्गाने होणारी वाळू तस्करी या अवजड वाहनांमुळे रस्ता पूर्ण खचला असून, रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी सामान्य नागरिकांना या ठिकाणाहून प्रवास करणे कठीण झाले आहे. याबाबत पेडगाव ग्रामस्थ व भारतीय संविधान संघर्ष समितीचे सदस्य नितीन घोडके (सर) व प्रकाश घोडके यांनी ग्रामस्थांच्या सह्या असलेले निवेदन उपअभियंता अंपळकर यांना सादर केले.

त्याचप्रमाणे श्रीगोंदा ते ढोरजा या रस्त्याचीही दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे नमूद ठिकाणाहून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. याबाबत ढोरजा ग्रामस्थांच्या सह्या असलेले निवेदन भारतीय संविधान संघर्ष समितीचे सदस्य प्रमोद उजगरे यांनी उप अभियंता अंपळकर यांना दिले आहे.
यावेळी भारतीय संविधान संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि उपअभियंता अंपळकर यांच्या मध्ये नमूद रस्ता दुरुस्ती बाबत सविस्तर चर्चा झाली. दिवाळीनंतर नमूद रस्त्यांवरील खड्डे तात्काळ भरून घेणार असल्याचे आश्वासन उप अभियंता अंपळकर यांनी उपस्थितांना दिले.
निवेदन देताना भारतीय संविधान संघर्ष समितीचे नितीन घोडके (सर), अमर घोडके, प्रकाश लोंढे, योगेश शिंदे, प्रकाश घोडके, सन्मान उजगरे, प्रमोद उजगरे, पिनू भैलुमे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत:(पेडगाव व ढोरजा ग्रामस्थांनी सादर केलेले निवेदन)
