दिनांक ३ डिसेंबर, श्रीगोंदा:
३ फेब्रुवारी २०२१ रोजी भारत सरकारने जाहीर केलेल्या नागरी सन्मान व समाज सेवेतील सन्मान यादीत गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री सन्मान जाहीर करण्यात आला. भटके विमुक्त समाज, अनं विशेषत: आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्याचा हा गौरव होता.
नमूद सन्माना बरोबरच अनेक सन्मान, सत्कार व शुभेच्छा लोकांनी व्यक्त केल्या. मात्र, यात श्रीगोंद्यातील सत्कार मनाची तार छेडून जाणारा होता. असे गौरवोद्गार गिरीश प्रभुणे यांनी त्यांच्या लेखातून नुकतेच नमूद केले आहे.
चारीधाम यात्रेचे पुण्य देणारा सत्कार या लेखात ते नमूद करतात… स्मरणात राहील अशा या दिल्लीवारीत विनयजींनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातही आठवणीने पोपटराव आणि मला आवर्जून घरी बोलावून, घरगुती सत्कार केला. पुण्यात पोहोचल्यावर असंख्य दूरभाष सत्कारांच्या मालिकेत एक सत्कार हृदयाची तार छेडून गेला. दौंड, काष्टी, अजनूज परिसरातील पारधी बांधवांनी केलेला सत्कार…!

अजनूजला वसतिगृह होतं. आनगावचा दीपक पाटील दोन-तीन वर्ष तिथं होता. नंतर अडचणीमुळे ते वसतिगृह बंद पडले. पण पालापालांत लागलेली ज्ञानाची ज्योत पारधी बांधवांनी विझू दिली नाही. पोलिसांचे अत्याचार, मारहाणी, गोळीबारात दुर्योधन काळेचा मृत्यू असा अंगावर शहारे उभा करणारा इतिहास असूनही वसतिगृह बंद झाल्यावरही पारधी बांधवांनी आपल्या मुलांना शिकवलं, मोठं केलं.
समीर काळे इंजिनीअर झाला. दुर्योधन काळेचा मुलगा पदवीधर झाला. मुलीनं लॉ ला प्रवेश घेतलाय. श्रीगोंदा-काष्टी परिसरातील पारधी बांधवांनी आपल्या मुलांना शिकवलं. पंधराएक पदवीधर झालेत. पंचवीसएक जण दहावी-बारावीपर्यंत शिकले.
काहींनी दारू गाळण्याचा उद्योग करत करत तर, काहींनी शेतात मजुरी करून, हे परिवर्तन घडवलं होतं. इथल्या महिला रामेश्वर ते जम्मूतावीपर्यंत भीक मागायला जायच्या. मागून आणलेले लाडू, पुरणाच्या पोळ्या, चपात्या कडक उन्हात वाळवून सणासुदीला त्याचा चुरा करून, त्यावर गरम पाणी घालून मुलांना खाऊ घालीत. वाळलेल्या पुरणाच्या पोळीची चव अमृतालाही लाजवेल अशी..!

गणेशाच्या मळ्यात गणेशाच्या मंदिरासमोर सर्व पारधी महिला नटूनथटून आल्या होत्या. सा-या गावात उत्सुकता. दोनचारशे पारधी, कुठला सण नाही, कुणाचा देवदेव नाही, तरी एवढे नटलेत कशामुळे…? The reception in Shrigonda made this Padma Shri person passionate ..!
पूर्वी बैठकांचा समारोप, मारामारी, हाणीमारीनंच होत असे. तीच मंडळी आज अत्यंत शिस्तीत, उत्साहात वागत होती, बोलत होती. चिराजीचा मुलगा तर एम. एस्सी. अॅग्री. होऊन आता युपीएससीची तयारी करीत होता! चिराजी स्वतः ग्रामपंचायतीत निवडून आला होता. माझं हृदय भरून आलं.
इतक्या हालअपेष्टातही आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन, त्यांनी कृतज्ञता भाव जपला होता. हा सत्कार राष्ट्रपती भवनातील सत्काराइतका भव्य-दिव्य नव्हता. अत्यंत साधा, आश्वासक असा. चारीधाम यात्रेचं पुण्य देणारा होता.
स्रोत:(गिरीश प्रभुणे यांच्या “चारिधाम यात्रेचं पुण्य देणारा सत्कार” या लेखातून..)
