“त्या काळरात्रीचा थरार”: रेल्वे अपघातात पाय गमावल्यानंतर सिराज शेख यांनी दिव्यांगांसाठी समर्पित केले जीवन..!

दिनांक १३ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा/दौंड:

तालुक्यातील काष्टी गावचे रहिवासी असलेले सिराज शेख यांच्या जीवनात २५ ऑक्टोबर २०११ ची रात्र ‘काळरात्र’ ठरली. मुंबई येथे कामासाठी जात असताना दौंड जंक्शन येथे त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना घडली, ज्यात त्यांना आपला उजवा पाय गमवावा लागला. मात्र, या दुर्दैवी घटनेतून सावरत त्यांनी दिव्यांगांसाठी आपले उर्वरित आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला असून, ते आज ‘प्रेरणा अपंग सेवाभावी संघटना’ आणि ‘प्रहार दिव्यांग संघटने’सोबत काम करत आहेत. संघटनेचे तालुका उपाध्यक्ष म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत.

२०११ साली मुंबई येथील एका खासगी कंपनीत रुजू होऊन तीन महिने झाले होते. पुढील कामाच्या अपडेटसाठी सिराज शेख हे २५ ऑक्टोबर २०११ रोजी संध्याकाळी काष्टीतून मुंबईसाठी निघाले. रात्री नऊच्या सुमारास दौंड जंक्शनवर ‘साई शिर्डी मुंबई पॅसेंजर’ गाडी आली.

गाडीला प्रचंड गर्दी असल्याने त्यांनी कसाबसा दारात उभे राहण्यासाठी जागा मिळवली. रात्री ९:२० च्या सुमारास गाडी दौंड जंक्शनवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

गाडी प्लॅटफॉर्म सोडून ‘A मंकी हाऊस’च्या दरम्यान पोहोचली असताना, गर्दीतून कुण्या अज्ञाताने जोराचा धक्का दिल्याने सिराज शेख गाडीतून खाली पडले आणि थेट रेल्वेच्या चाकाखाली आले. या अपघातात त्यांचा उजवा पाय पंजापासून कापला गेला.

रक्ताच्या थारोळ्यात अंधारात वेदनेने विव्हळत असताना, जवळच असलेल्या आरपीएफ (RPF) जवानांनी बॅटरीच्या प्रकाशाने त्यांना पाहिले आणि तातडीने धाव घेऊन मदत केली. ॲम्बुलन्सच्या साहाय्याने त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा जीव वाचला, मात्र उजवा पाय त्यांना गमवावा लागला.

या घटनेबाबत ‘निर्भीड कलम’शी बोलताना सिराज शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “ती रात्र माझ्यासाठी काळरात्र ठरली होती. लागलेला चांगला जॉबही हातातून गेला,” असे ते म्हणाले. साधारण सहा महिन्यांच्या उपचारानंतर कृत्रिम पाय बसवून ते चालू शकले.

या काळात त्यांना समाजात दिव्यांगांप्रती लोकांच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रियांचा अनुभव आला आणि याच अनुभवातून त्यांनी आपले आयुष्य दिव्यांगांसाठी खर्ची घालण्याचा निर्णय घेतला. “आजही अपंग बांधवांसाठी मी अहोरात्र काम करतो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या दुर्दैवी प्रसंगातून सावरत सिराज शेख यांनी लोककल्याणाचा आणि दिव्यांगांच्या प्रबोधनाचा जो मार्ग निवडला आहे, तो अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा दुर्लक्षितांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने ‘निर्भीड कलम’ने हे नवीन सदर सुरू केले आहे.

स्रोत:(सिराज शेख यांची मुलाखत)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading