श्रीगोंदा: १९८० साली जे आमदार झाले ते पुन्हा २०१९ साली आमदार झाले. असे आमदार अहमदनगर जिल्ह्यात कोणी नाही. हा विक्रम फक्त आमदार बबनराव पाचपुते यांच्या नावावर !

गेली ४३ वर्षे श्रीगोंदयाचे राजकारण पाचपुते भोवती फिरते ठेवले. या काळात ९ विधानसभा निवडणुका सलग पाचपुते यांनी वेगवेगळ्या चिन्हावर लढवून ७ वेळा आमदार झाले. एकदा गृहराज्यमंत्री तर, दोनदा कॅबिनेट मंत्री झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात श्रीगोंदयाचा माणूस गेला व कोणी विचारले कुठले.? त्याने सांगितले श्रीगोंदा तर, समोरचा आपसूक विचारणार बबनराव पाचपुते यांच्या मतदार संघातील का? अशी ओळख.
शिवाय १९८५ साली स्वर्गीय इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याने निवडणुकीत काँग्रेस लाटेत अनेक दिग्गज विरोधक पडले आणि काँग्रेसचे नवे चेहरे निवडून आले. पण, बबनराव पाचपुते विरोधी पक्षात राहून विजयी झाले. हा प्रताप त्यांनी केला. पण २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेत भाजपचे नवे चेहरे, नेवासाचे बाळासाहेब मुरकुटे निवडून आले. तिथे बबनराव पाचपुते मात्र, पराभूत झाले. हे का घडले यामागे मोठा इतिहास आहे.
श्रीगोंदयाचाच नव्हे तर, जिल्ह्याच्या विकासात पाचपुते यांचे योगदान असतांना, घडले. हे विशेष पण, लोकांशी असलेली नाळ त्यांना पुन्हा २०१९ साली आमदार करून गेली. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, ठिबक सिंचन, ऊस पट्टा पद्धत, वीज केंद्र, उपकेंद्रे, बंधारे, पालकमंत्री असतांना उभारलेल्या छावण्या, परमिट राज संपताच खाजगी साखर कारखाना उभारणीत पुढाकार यातून आमदार पाचपुते यांची दूरदृष्टी दिसली. पण, अनेक कार्यकर्ते साथ सोडून गेले.
त्यांचा पिंड विरोधी पक्षाचा तसेच विधानसभा मधील प्रश्न मांडण्याची पद्धत, विशिष्ट लतीतील बोलणे, यातून ते प्रसिद्ध झाले. राज्यात फिरताना तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी त्यांचे बंधू स्वर्गीय सदाशिव आण्णा पाचपुते यांनी घेतलेले कष्ट आणि स्टेज सांभाळण्यासाठी स्वर्गीय तुकाराम दरेकर, सतीश पोखरना, अण्णा पाटील पवार, डी एम भालेराव ही मंडळी होती.

दुर्दैवाने वरील सर्व मंडळी आज हयात नाही. आमदार पाचपुते यांनी अनेक कार्यकर्ते रुपी रोपटे लावले. पण काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या या रोपांना विखे, थोरात खत मिळाल्याने त्यांचे वृक्षांत रूपांतर होऊन इतकी बहरली की, अडचणीत छोट्या मोठ्या निवडणुकीत स्वतः पाचपुते यांनाच या वृक्षांच्या सावलीत थांबण्याची वेळ आली.
तालुक्यातील विकासाचे पर्व लिहिताना पाचपुते यांना मानाचे स्थान द्यावे लागेल. तिथे वरील गोष्टी देखील विचारात घ्याव्या लागतील. हरिदास शिर्के, माजी नगराध्यक्ष गटनेते मनोहर पोटे, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख, बाळासाहेब नाहटा, अण्णासाहेब शेलार ही मूळची पाचपुते कारखान्यात तयार झालेली मंडळी पण, बाहेर पडली. त्यांच्या बाबत वेळीच दखल घेतली नाही. स्वर्गीय तुकाराम दरेकर सर हे तर चालते बोलते पाचपुते यांचा बायोडाटा शिवाय त्यांची नाराजी वेळीच दूर झाली नाही.
(३ शेलार) शिवाजी शेलार, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार पाचपुतेयांच्या जवळ आले आणि गेले, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार यांनी तर पाचपुते विरोधात निवडणूक लढवली हे विशेष. आज पाचपुते विरोधी पक्षाचे आमदार आहेत. आजारपणामुळे अनेक मर्यादा आहेत. तरी, देखील गतवर्षी १ जून रोजी पावसात उपोषण केले. दूध आंदोलन, मंदिर उघडण्यात यावे यासाठी आंदोलन केले. त्यांना आजारपणामुळे फिरण्यासाठी मर्यादा आहेत. हेही मतदारांना मान्य आहे. तेंव्हा मुलाने सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे. पण, तसे घडत नाही. अशी चर्चा आहे.
बबनराव पाचपुते हे नेतृत्व ४ दशके राजकारण, समाजकारण करत आहे. आता काळ बदलत आहे. मतदारसंघातील प्रश्न बदलत आहेत. जुने सहकारी नाहीत. अशा परिस्थितीत बदलते राजकारण करण्याची गरज आहे. मुत्सद्दी, असल्याने ते प्राप्त परिस्थितीवर मात करतील अशी अपेक्षा करूया. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने हा भूत-भविष्याचा आढावा
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
स्रोत:(मुश्ताक पठाण पत्रकार, श्रीगोंदा)
